नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टीका केली होती. त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात दिसू लागले आहेत. शरद पवारांनी काँग्रेसची काळजी करू नये. त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असला, तरी ते आतापर्यंत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसवू शकले नाहीत, अशी जोरदार टीका महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा
माजी केंद्रीयमंत्री आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीसारखी झाल्याची टीका केली आहे. त्यावर राऊत म्हणाले, “काँग्रेस पक्षावर अनेकवेळा अशी स्थिती आली. त्यातून हा पक्ष बाहेर पडला आणि पुन्हा उभा राहिला. आताही पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पवारांनी काँग्रेसची चिंता करू नये. दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा, असा पलटवार नितीन राऊत यांनी केला आहे.
पवार हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. ते महाराष्ट्रात सत्तेत आमचे सहकारी आहेत. मात्र एका मित्र पक्षाबद्दल, ते अशी टीका करणार असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका सहन केली जाणार नाही. पवार यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला असला, तरी त्यांना राज्यात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांनी त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाची स्वबळावर सत्ता आणली. त्या मुख्यमंत्री बनल्या. पण पवार तसे करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये, असे नितीन राऊत म्हणाले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
“आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.