HW News Marathi
महाराष्ट्र

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री!

गुजरात। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल(१२ ऑगस्ट) अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं.नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावं चर्चेत होती. त्यात प्रामुख्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, नेहमप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांनी पुन्हा एकदा सगळ्याचे अंदाज चुकवत आपल्या धक्कातंत्राचा वापर करत एका अगदीच नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. यापुढे गुजरातचे मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल असणार आहेत.

शनिवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. नेमका रुपाणी यांनी पदाचा राजीनामा का दिला? याविषयी अनेक कारण दिली जात असताना आज गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यासोबतच अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्यानंतर कोण येणार? या चर्चेमध्ये कुठेही भूपेंद्र पटेल यांचं नाव नव्हतं. त्यामुळे विजय रुपाणी यांनी ज्या प्रकारे अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तितक्याच अचानकपणे भूपेंद्र पटेल यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन जिंकलं देखील आहे! २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी १ लाख १७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. संपूर्ण गुजरातमध्ये २०१७च्या निवडणुकांमध्ये हा सर्वाधिक मतांचा फरक होता.

विजय रुपाणी यांनी राजीनामा का दिला?

‘मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे, असे रुपाणी यांनी, शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाचे राज्यप्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांच्यासह रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामापत्र सुपूर्द केले. ‘‘पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची मला संधी देण्यात आली. मी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आता पक्षाच्या आदेशानुसार वाटचाल करेन,’’ असे रुपाणी यावेळी म्हणाले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री म्हणून राज्यातील नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अमृता फडणवीसांची ठाकरेंवर विखारी टीका”

News Desk

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या डिग्रीला किंमत राहील, फडणवीसांचा युवसेनेला टोला

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळ यांची माहिती!

News Desk