मुंबई | पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधे एमके स्टॅलिन यांना विजय मिळवून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे की राजकीय याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. भाजपने बंगालमधे १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी माझं काम सोडेन, अशी प्रतिज्ञा प्रशांत किशोर यांनी केली होती, पण तसं काहीच घडलं नाही. त्यांचं भाकीत खरं ठरूनदेखील त्यांनी विजयाच्या शिखरावर असताना स्ट्रॅटेजी आखण्याच्या कामातून संन्यास घेतला आहे. प्रशांत किशोर आज )११ जून) थोड्याच वेळात शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत. दरम्यान, गेले अनेक दिवस अनेक नेतेमंडळी शरद पवारांच्या भेटी घेतंच आहेत.
निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोरांचा संन्यास
पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही बोलणी होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष – शरद पवार
काल (१०जून) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २२ वा वर्धापन दिन होता. या निमित्ताने पवार बोलत होते. कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात म्हटले होते. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवारांकडे मोदींनी केली पवारांची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला अजित पवार, उद्दव ठाकरे गेले होते. या वेळी अजित पवारांना मोदींनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं समजतं. यावर राष्ट्रवादीकडून ठोस अशी माहिती सांगण्यात आलेली नाही. पण दिल्ली वर्तुळात यावर चर्चा आहे. आणि तरीही शरद पवार सक्रिय दोन महिन्यांपुर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईत दोन शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले होते. पवारांच्या ह्याच दोन शस्त्रक्रियांबाबत मोदींनी चौकशी केल्याची चर्चा आहे.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही पवारांनी आवश्यक तेवढाच आराम करत कामाला लागले. हॉस्पिटलमधूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी कामाची चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी व्हायरलही झाली होती. पवार आणि मोदी हे दोन्हीही राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळेच एकमेकांच्या कामाबद्दल ते टिकाटिप्पणी करत असले तरीसुद्धा ते एकमेकांची आस्थेनं विचारपूस करण्याचं विसरत नाहीत हेच खरं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.