HW News Marathi
महाराष्ट्र

“केंद्राने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या त्यामुळे माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा”   

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीचा तुटवडा होत आहे. राज्यात सद्यस्थितीतला ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. लसीच्या तुटवड्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा, असा खोचक सल्ला दिला आहे.

‘लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राशी संवाद करा’

राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

अन्यथा उद्रेक होईल- फडणवीस

राज्यात विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस कडक निर्बंध लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण आज सातही दिवस 100 टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. पण आता जे निर्बंध घातले गेले आहेत, ते विचार न करता घातले गेलेत. मला १७ असोसिएशनचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिलाय. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतोय. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकाची फरफट होत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढावा. अन्यथा उद्रेक होईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला आहे.

सरकारच्या करणी आणि कथनीत अंतर

राज्य सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात मोठं अंतर आहे. ज्या दिवशी सरकारने निर्बंघ लावण्याची घोषणा केली, तेव्हा ते योग्य वाटत होते. विकेंडला पूर्ण लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस पुणे किंवा नागपूर पॅटर्न राबवला जाईल असं वाटत होतं. पण सरकारनं सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन केल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांकडून बळाचा वापर करुन निर्बंध लादले जात आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा

राज्यात अनेक शहरातील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप केला जातोय. त्याबाबतही फडणवीसांनी सरकारला आवाहन केलं. राज्य सरकारनं रेमडेसिवीरबाबत तत्काळ कारवाई करायला हवी. इंजेक्शनचा काळाबाजार रोखला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांची भेट घेणार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लवकरच ही भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ही राजकीय भेट नसून शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे मागील आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सिल्वर ओक या निवास्थानी विश्रांती घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जबाजारी शेत-यांने केली आत्महत्या

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळूनही नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk