HW News Marathi
Covid-19

केंद्र सरकारने महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन वाटपामध्ये झुकतं माप द्यावं – राजेश टोपे

मुंबई | कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. “राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत”, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये झुकतं माप द्यायला हवं, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

“पुढचे १० दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वत: केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधल्या उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे.

“त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. एका किलोमध्ये २० हजार इंजेक्शन तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांविषयी ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती. मात्र, म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचं टोपे यांनी जाहीर केलंय. त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात सध्या असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या पाहता 2 लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.

“म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

एका रुग्णाला १०० इंजेक्शन रोज लागतात!

म्युकरमायकोसिसवर आवश्यक असणाऱ्या उपचारांची आणि त्यांच्या उपलब्धतेविषयी देखील राजेश टोपे यांनी यावेळी माहिती दिली. “म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी दररोज १०० लागतात. पुढे दर आठवड्याला ५०० च्या आसपास रुग्ण वाढणार आहेत. या क्षणाला आपल्याला दीड ते दोन लाख इंजेक्शन हवे आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार इंजेक्शन्सची ऑर्डर देखील आपण दिली आहेत”.

“तिचे पैसे देखील आपणच देणार आहोत. पण त्याचं वाटप कसं करायचं, हे केंद्राच्या हातात आहे. जशी रेमडेसिविरला एक स्थिरता आली आहे, तशी या बाबतीत ३१ मेनंतर इंजेक्शनची उपलब्धता होईल. त्यामुळे पुढचे १० दिवस अडचणीचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रयत्न करून हे इंजेक्शन पुरवावेत”, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, यूजीसीकडून परीक्षांसाठीची कार्यपद्धती (SOP) जाहीर

News Desk

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

News Desk

इंधन दरवाढ कायम, जाणून घ्या…आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

News Desk