HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचे विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

पुणे | ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे यांचे निधन झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात.

संभाजीराव काकडे यांचे आज (१० मे) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडवणारे म्हणून संभाजीरावांची ओळख होती.

आमदार-खासदार म्हणून काकडेंची कारकीर्द

1971 मधील विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा संभाजीराव काकडे आमदार झाले. ते परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रंगराव पाटील यांचा पराभव केला होता. संभाजीराव काकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

1978 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1982 मध्ये जनता दलातर्फे ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते.

सुरुवातीला सिंडीकेट काँग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना आणि तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.

अजित पवारांकडून संभाजीचा काकडेंना श्रद्धांजली

“संभाजीराव काकडे सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे 

News Desk

चार महिन्यात चार डीजी निवृत्ती होणार

News Desk

दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट !

News Desk