मुंबई | भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर चुकीचा उल्लेख झाल्यानं सगळीकडे चर्चा सुरू आहे. चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. अनिल देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. “याच्यामागे कोण आहे हे भाजप नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता. https://t.co/XxS3Z9wVuo
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 28, 2021
काय म्हणाले होते अनिल देशमुख?
“भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल असा अपमानास्पद उल्लेख पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
रक्षा खडसे काय म्हणाल्या?
“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे.
माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.