HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत हे नियम लागू राहतील. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार चांगलेच सतर्क झाल्याची माहिती मिळत आहे.

ब्रिटनसह जगातील अन्य ६ देशांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर, संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन तर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा ७ व्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, ‘ही’ आहे नवी तारीख 

News Desk

‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

News Desk

अहमदाबादमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी व्यवहारावर बंदी

News Desk