नवी दिल्ली | राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यातील सत्ता समीकरणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते . अखेर आज दोन्ही पक्ष अधिकृतरीत्या वेगळे झाले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलविली होती. मात्र, या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला देण्यात आले नव्हते. “शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार आहेत. त्यांना (शिवसेनेला) लोकसभा आणि राज्यसभेच्या विरोधी बाकांवर जागा दिली आहे”, अशी अधिकृत घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.
Pralhad Joshi, Union Minister: Shiv Sena is not coming to NDA meeting. Their minister Arvind Sawant has resigned. They're trying to work with Congress, so naturally, they've opted to sit in opposition & we've agreed to that. We're allotting them seat in opposition both in LS & RS pic.twitter.com/lFlbjCxu3U
— ANI (@ANI) November 17, 2019
“आधीच त्यांनी (शिवसेनेने) सांगितले होते कि, आम्ही ‘एनडीए’च्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. त्यांच्या केंद्रीय मंत्र्याने देखील राजीनामा दिला आहे. शिवसेना सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनीविरोधी बाकावर बसण्याची तयारी दाखवली आहे आणि आम्ही त्यांना सहमती दिली आहे. त्यानुसार, आम्ही त्यांना (शिवसेनेला) लोकसभा आणि राज्यसभेच्या विरोधी बाकांवर जागा दिली आहे”, असे प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
अरविंद सावंत यांचे वक्तव्य
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तुम्ही युतीतून बाहेर पडलात का ? असे त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावेळी, “तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा”, असे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. तेव्हा शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली नव्हती.
एनडीएच्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही !
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत मोठा बेबनाव निर्माण झाला. इतकेच नव्हे तर जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही शिवसेना ही भाजपप्रणीत ‘एनडीए’मधून जवळपास बाहेर पडलेलीच आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता सोमवारी (१८ नोव्हेंबर) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली असून शिवसेना मात्र या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. “एनडीएच्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही”, असे स्पष्ट विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (१६ नोव्हेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.