मुंबई | भाजपला रामराम करत जयसिंगराव गायकवाड यांनी आज (२४ नोव्हेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादीत प्रवेश केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या जयसिंगराव गायकवाड यांनी बंड करत आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत मोठे गौप्यस्फोट केले. ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशा शब्दात जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
’१७ नोव्हेंबरला मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीवाना दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे’ अशी मोठी घोषणा जयसिंग गायकवाड यांनी व्यासपीठावरून केली. यावेळी ते म्हणाले की, ‘मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली १२ वर्ष भाजपसोबत होतो. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे. एखाद्या कुख्यात अतिरेक्याने भाजपला ताब्यात घ्यावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे’ अशा शब्दात गायकवाड यांनी भाजवर घणाघाती टीका केली.
राष्ट्रवादीत प्रवेश करतना आता मी मोकळा श्वास घेत असल्याचं गायकवाड म्हणाले. भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एखाद्या गोडाऊनमधून बाहेर आल्यावर आपण जसा मोकळा श्वास घेतो, तसा मी आता मोकळा श्वास घेतोय अशी प्रतिक्रिया जयसिंग गायकवाड यांनी दिली.
‘मी जेव्हा निवडून आलेलो तेव्हा एकूण 34 उमेदवार होते. तरीही मी 20 हजार मतांच्या फरकाने जिंकून आलो होतो. विशेष म्हणजे उर्वरित 33 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती. ते रेकॉर्ड अजूनही कुणी मोडलेलं नाही. पण आता मी ठरवलंय महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा द्यायचा, 40 हजार मतांच्या फरकाने जिंकून आणायचं’ असंही यावेळी जयसिंग गायकवाड यांनी सांगितलं.
“एवढ्या वर्षांपासून आम्ही केलं. आंदोलन, उपोषण, किती मेहनत केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्या. भाजपमध्ये आता जे आहेत त्यापैकी कुणीच नव्हतं. तेच काय त्यांचे बापही नव्हते. बाप म्हणजे आदराने बोलतोय. आता जे आहेत त्यांना विचारा कुणीतरी की, तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का? काही नाही फक्त आयत्या पिठावर हे रेघा मारायला आले आहेत. आता मी आलोय साहेब. येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत”, असा घणाघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जयसिंगराव गायकवाड यांनी केला. “कुणाला साथ द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे. कामाचा पत्ता नाही. पण मी पणा भरपूर आहे. अशा लोकांशी कसं काम करायचं?”, असा सवाल जयसिंगराव यांनी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.