HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही!

मुंबई | “भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत आणि छाती पिटत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत,” असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेचा आणि आरएसएसचा दसरा मिळाव्यावर दोन्ही पक्षप्रमुखांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरणं देण्यात आलं आहे.

“हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला आणि राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!

दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले! सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संपुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका श्री. भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत. शिवतीर्थावरील मेळाव्यात (वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहातील) मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन श्री. ठाकरे यांनी खडसावले आहे.

की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही. मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची उपमा देणाऱया नटीचा आदरसत्कार करणे हे काही आमच्या हिंदुत्वात बसत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही.

महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे व श्री. ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळय़ास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत.

घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. त्यासाठी आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत. ‘‘आमच्यासाठी ‘हिंदुत्व’ हा शब्द आपल्या प्रथापरंपरांवर आधारित मूल्य पद्धतीचा आहे. त्यामुळेच या व्याख्येत 130 कोटी भारतीय येतात. आम्ही व्यापक अर्थाने हिंदुत्वाकडे पाहतो’’ हे श्री. भागवतांचे विधान आजच्या स्थितीत महत्त्वाचे आहे. हिंदुत्व हा हिंदू समाजाची एकात्मता दाखविणारा शब्द आहे. तो शब्द हिंदुस्थानातील बहुसंख्य समाजाचे राष्ट्रीयत्व दर्शवितो. त्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पुठल्याही प्रकारे संबंध येत नाही. निधार्मिकतेचा संबंध शासन संस्थेशी असतो आणि आजपर्यंतचे सर्व हिंदू शासक व शासन संस्था निधर्मीच होते.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेच. हिंदुत्वाची व्याख्या आज कधी नव्हे इतकी संपुचित झाली आहे. बलात्कार, खून यांसारख्या प्रकारांतही अनेकांना हिंदुत्व दिसू लागले तेव्हा धक्काच बसतो. उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, पेंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी अभिमानाने ठेवलीच आहे. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले…!

Aprna

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

News Desk

लासलगाव जळीत कांड : पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवले

News Desk