मुंबई | राज्यात कोरोनाचे केंद्रबिंदू हे सद्यस्थितीला मुंबई बनत चालले आहे. ३०-३१ मार्च या दोन दिवसांत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली. दरम्यान, पोलीस, प्रशासन, डॉक्टर सगळेट जण कोरोनाचा मुंबईभोवतीचा हा विळखा कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या आणि त्याच्या आसपासच्या १४६ विभागांना महापालिकेने सील केले असून त्या परिसराला ‘नो गो झोन’ असे नावही देण्यात आले आहे. नागरिकांनी या ‘नो गो झोन’मध्ये येऊ नये असे आवाहनही पालिकेकडून केले जात आहे.
मुंबईत प्रामुख्याने दक्षिण मुंबईत ४८ परिसरांमध्ये कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण आढळले आहेत. या परिसरांमध्ये मलबार हिल, बेलासीस रोड, प्रभादेवी, वरळी, वाळकेश्वर यांचा समावेश आहे. वरळी कोळीवाड्यातील संख्या १० वर गेली आहे. वरळी कोळीवाड्यात ७५ हजाराहून अधिक लोकं राहतात. त्यामुळे प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करणे पालिकेला शक्य नसल्यामूळे कोळीवाड्यात आजपासून (१ एप्रिल) आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या परिसरात २४ तासांसाठी दवाखानाही सुरू करण्यात आला असून १ रुग्णवाहिकाही या परिसरात ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.