मुंबई | जगभरात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतातही आता कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला आहे. देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा १०२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, ‘कोरोना’विरुद्धच्या या लढाईत प्रत्येकजण आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहे. देशातील राजकीय नेते, धार्मिक संस्था, कलाकार मंडळी, स्वयंसेवी संस्था, उद्योगपती आपापल्यापरीने हातभार लावत आहेत. रिलायन्स समूहाने सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये देशातील कोरोनाबाधितांसाठी केंद्र उभारले आहे. त्याचप्रमाणे शनिवारी (२८ मार्च) टाटा समूहाने कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी तब्बल ५०० कोटींचा निधी जाहीर केल्यानंतर आता बीसीसीआयने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे.
NEWS : BCCI to contribute INR 51 crores to Prime Minister @narendramodi ji's Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund
More details here – https://t.co/kw1yVhOO5o pic.twitter.com/RJO2br2BAo
— BCCI (@BCCI) March 28, 2020
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एक परिपत्रक काढून बीसीसीआयने हे जाहीर केले आहे. कोरोनाला लढा देण्यासाठी देशाला सध्या आर्थिक तरतुदीची सर्वाधिक आवश्यकता आहे. त्यामुळे, सर्व स्तरातून पुढे येणाऱ्या या आर्थिक मदती अत्यंत आवश्यक आणि दिलासादायक आहेत. याच पार्श्वभूमीवर, यापूर्वी केंद्राने १५ हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे, तर देशातील प्रत्येक पोट भरावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील स्वतः वैयक्तिकरित्या 50 लाख रुपये खर्चून गोरगरिबांसाठी मोफत तांदूळ वाटणार असल्याचे जाहीर केले आहे. तर प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.