कर्जत | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु रोहित नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे पक्षश्रेष्ठी ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता मात्र आजवरच्या सामाजिक, राजकीय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. रोहित यांनी कर्जत जामखेडामधून निवडणूक का लढविणार ? यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रोहित पुढे असे देखील म्हणाले की, पक्षाच्या वतीने येथून लढण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कर्जत जामखेड का?, रोहित पवारांचे स्पष्टीकरण
कर्जत जामखेडमधील तरुणांशी, महिला, विद्यार्थ्यां, शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी या समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली. पण जेव्हा कर्जत जामखेडमधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली, तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
राजकीय वारसा असताना जिल्हा परिषदच का?
मी पवारांसारख्या राजकीय वारसा लाभलेल्या मोठ्या कुटूंबात जन्म घेणे, ही नशिबाची आणि अभिमानाची गोष्ट असू शकते. पवारांच्या घराण्याचा राजकीय वारसा आहे. त्याहून ती मोठ्ठी “जबाबदारी” आहे. रोहित यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषदेमार्फत तळागाळातील समस्या जाणून घेऊन शिक्षण, आरोग्य, युवक, महिला, क्रिडा, बेरोजगारी अशा प्रत्येक ठिकाणी शक्य तितके काम यशस्वीपणे करु शकलो. रोहित यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे नियमांप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक, राजकीय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देण्यात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.