मुंबई | “जर ३१ मेपर्यंत डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली नाही तर आम्ही १ जूनला नायर हॉस्पिटल बंद पाडणार. त्याचप्रमाणे तेव्हाच आम्ही या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची देखील मागणी करू”, असा इशारा काँग्रेस नेते आणि माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी दिला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, डॉ. तडवी यांचे नातेवाईक आणि नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठतांची झालेली बैठक पूर्णपणे निष्फळ ठरल्याने आता या पार्श्वभूमीवर डॉ. तडवी यांचे नातेवाईक मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
“आदिवासी-दलित मुले हालअपेष्टा सहन करून ज्या परिस्थितीत शिकतात त्यांना आत्महत्या करावी लागते ही किती मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र शासनाला यासंबंधी कारवाई करावीच लागेल. मला खात्री आहे कि ते अशा प्रकारची नामुष्की येऊ देणार नाहीत. जर ३१ मेपर्यंत डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली नाही तर आम्ही १ जूनला नायर हॉस्पिटल बंद पाडणार”, असे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे.
जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अद्याप प्रशासन कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. याविरुद्ध आज (२८ मे) डॉ. तडवी यांच्या कुटुंबियांकडून नायर हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी पोहोचत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.