HW News Marathi
महाराष्ट्र

पोहरादेवी विकास आराखड्यातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडेल

विनोद तायडे

वाशिम, : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली आहे. त्यामुळे पोहरादेवी विकासाला गती मिळणार आहे. या आराखड्याच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे दर्शन भावी पिढीला घडेल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पोहरादेवी येथे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेल्या विकास आराखड्याविषयी चित्रफितीच्या सादरीकरणाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पोहरादेवी संस्थानचे रामराव महाराज व कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, तेजुसिंग पवार, रामेश्वर नाईक, डॉ. शाम जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित भाविकांसमोर पोहरादेवी विकास आराखड्याविषयी चित्रफितीचे स्क्रीनवर सादरीकरण करण्यात आले.

पालकमंत्री ना. राठोड म्हणाले, बंजारा समाजाचे पोहरादेवी हे एकमेव तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी रामनवमीला देशाभरातून भाविक येतात. बंजारा समाजाच्या या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे विकास आराखड्याच्या कामाला गती मिळाली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बंजारा समाज, संस्कृतीचा संपूर्ण अभ्यास करून विकास आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले आहे. या आराखड्याच्या माध्यमातून पोहरादेवी येथे भव्य वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. देशभरातील बंजारा समाज बांधवांच्या संस्कृतीचे, इतिहासाचे दर्शन भावी पिढीला घडणार आहे. यामधून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

पोहरादेवीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच बंजारा समाजाचे इतरही प्रश्न सोडविण्यासाठी ते अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून बंजारा समाचा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पोहरादेवी येथील विकास आराखड्यासाठी शासने जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच यापुढेही आराखड्यातील विकास कामे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. यात्रा स्वच्छता अभियान राबविणारे राजेश्वर निवळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

पोहरादेवी येथील वस्तुसंग्रहालय प्रेरणादायी ठरेल : कला दिग्दर्शक नितीन देसाई

बंजारा समाजाला खूप मोठा इतिहास आहे. देशभरात विखुरलेल्या या समाजाची संस्कृती, जीवनशैली प्राचीन आहे. पोहरादेवी येथे उभारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयात बंजारा समाजाच्या प्राचीन इतिहासाचे व जीवनशैलीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हे वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरेल, असे मत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितले. पोहरादेवी विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या वस्तू संग्रहालायाविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संजय राठोड हे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने पोहरादेवी विकास आराखड्याचे संकल्पचित्र काम अतिशय गतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पोहरादेवी विकास आराखड्यासाठी प्रस्तावित जमिन, वन उद्यानाची पाहणी पालकमंत्रीसंजय राठोड व कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पोहरादेवी येथे राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याच्या प्रस्तावित जमिनीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विकास आराखड्याच्या प्रस्तावित जागेची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली. पोहरादेवी ते पंचाळा मार्गाच्या बाजूला असलेल्या गट क्रमांक १६ मधील जमिनीवर पोहरादेवी विकास आराखड्यातील वस्तू संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित आहे.

यानंतर पालकमंत्री ना. राठोड व कला दिग्दर्शक देसाई यांनी अधिकाऱ्यांसह वन विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या वन उद्यानाला भेट दिली. याठिकाणी गतवर्षी २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत २७ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. एन. नानोटे यांनी यावेळी सांगितले. तसेच बाल उद्यान, औषधी वनस्पती लागवड, नैसर्गिक पाऊलवाट आदी कामे सुरु असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच वन उद्यानात समाविष्ट असलेली इतर कामेही वन विभागाने तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

News Desk

HW Exclusive | “आमच्या मुलीला ‘हा’ स्ट्रेस होता”, पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

अयोध्या दौऱ्यावरून वातावरण खराब होता कामा नये! – प्रविण दरेकर

Aprna