HW News Marathi
महाराष्ट्र

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरात

मुंबई। केंद्रातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष या ज्वलंत मुद्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे नाव न घेता बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशातील जनता महागाईने होरपळत आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न आहेत. केंद्र सरकार या प्रश्नावर अपयशी ठरलेले आहे, मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काही लोकांना पुढे करून भाजपा राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असून प्रशासन त्यांचे काम करत आहे पण काही लोक वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत. हनुमान चलीसाला राजकीय मुद्दा बनवले आहे, त्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष असून काही चेहरे पुढे केले जात आहेत.

महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे मनसुबे ओळखून आहे, सरकार भक्कम आहे व आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. तसेच राज्यातील जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या षडयंत्राला ते बळी पडणार नाहीत. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना आघाडीने पाठिंबा दिला होता पण विजयी होताच त्यांनी त्यांचे रंग बदलले. त्यांना पाठिंबा देऊन आम्ही चूक केली असे आज वाटते.

Related posts

उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे २ तास बंद

News Desk

इतिहासकार पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचे निधन

News Desk

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

News Desk