HW News Marathi
मनोरंजन

आज ‘ मिर्झा गालिब ‘ यांची २२१ वी जयंती

धनंजय दळवी | आपला देश एक राष्ट्र म्हणून खरोखरच खुप श्रेष्ठ आहे . प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाने आपले श्रेष्ठत्व सिध्द केलेले आहे . कला, संस्कृती आणि साहित्याचा फार मोठा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे .संगीत आणि साहित्याचे अनेक जगप्रसिध्द कलावंत भारताने जगाला दिलेले आहे . हजार वर्षांची गुलामी असूदे , राजनैतिक पारतंत्र्य असूदे , शंकांचे अत्याचार असूदे , कोणताही अनाचार असूदे पण कलेची आणि कलाकारांची या देशाला कधीही कमतरता भासली नाही . अशाच इंद्रधनुषी कलेच्या एका रंगातले नाव आहे , ‘ मिर्झा गालिब .’

फारसी आणि उर्दूच्या या महान शायरचे पूर्ण नाव मिर्झा असदुल्लाहखां गालिब . पण रसिकांमध्ये ‘ मिर्झा गालिब ‘ या नावाने प्रसिध्द . दिल्लीच्या बल्लेमारनच्या एका घरात मंगळवार २७ डिसेंबर १७९७ ला मिर्झा गालिबचा जन्म झाला . काही विद्वान यांचा जन्म गुरुवार ०८ जानेवारी १७९७ असाही मानतात . सतराव्या शतकातील कवी मिर्झा गालिब यांच्या आज २२१ व्या जयंती आहे. मुघल काळातील मिर्झा असदुल्ला बेग खान यांनी उर्दू, तुर्की आणि फारसी या भाषांमध्ये केलेले लिखाण आजही लोकांना भुरळ घालणारे आहे. ते नेहमी त्यांचे टोपणनाव गालिब आणि असद या नावांनीच प्रसिध्द होते.

विशेषतः त्यांच्या उर्दू कविता आणि शायरीचे तेव्हा प्रमाणेच आताही चाहते आहेत. आयुष्याकडे बघण्याचा परिपूर्ण ‘नजरीयाँ’ (दृष्टीकोन) त्यांच्या कविता आणि शायरींमधून आपल्याला उमगतो. त्यांच्या काही उर्दू गझलही प्रसिध्द आहेत. ‘आ की मेरी जान को करार नहीं है’, ‘आबरु क्या खाक उस गुल की की गुलशन में नहीं’, ‘आह को चाहिए एक उम्र असर होते तक’, ‘आईना क्यु न दु की तमाशा कहे जिसे’ या गझलांनी संगीत चाहत्यांना वेड लावले. तर ‘इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वर्ना हम भी आदमी थे काम के’ अशा त्यांच्या शायरी चाहत्यांना ‘दिवाना’ करणाऱ्या आहेत.

मिर्झा गालिब स्वत:ला फारसी भाषेचा शायर मानीत असे . पण ते उर्दू भाषेत देखील फार उत्तम शायरी करायचे . गालिब स्वत:ला फारसी भाषेचा उत्तम शायर मानत असले तरी त्यांना नाव आणि प्रसिद्धी मात्र उर्दू शायरी मुळेच मिळाली . उर्दू शायरीच्या रसिकांना नंतर नंतर हा प्रश्न पडू लागला की उर्दू भाषेने मिर्झा गालिबला प्रसिद्धी मिळवून दिली की गालिबमुळे उर्दू भाषेला प्रसिद्धी मिळाली . एका शायरसाठी असलं मत असणं हा फार मोठा सन्मान आहे . पण इतकं मात्र नक्की की उर्दुभाषेतली शायरी आणि मिर्झा गालिब यांना वेगळं करता येत नाही . आणि आज जर का मिर्झा गालिबला सगळं जग ओळखत असेल तर ते फक्त उर्दू भाषेमुळे . कारण फारसी भाषा ही फारशी प्रचलनात नाही . दुसरं म्हणजे उर्दू भाषेत बरेच मोठे शायर होऊन गेले पण मिर्झा गालिबने उर्दू भाषेला जो मान सन्मान देवविला आणि त्या भाषेत जो निखार आणला , जी उंची दिली , जे सौंदर्य प्रदान केले , जितके महत्व दिले , आणि ज्या कलात्मकतेने उर्दू शब्दांचा वापर केला तो इतर उर्दू शायरांच्या बाबतीत सहसा आढळत नाही . गझल म्हणजे छंदात बंदिस्त एक काव्य प्रकार . मिर्झा गालिब सारख्या शायारांमुळे ही गझलविधा पुढे सगळ्या मानवी भावनांना कवेत घेण्यासाठी , त्यांना हुंकार देण्यासाठी समर्थ ठरली . गझल म्हणजे मुक्तक , कविता पण म्हणता येऊ शकते . गझलमध्ये चार , सहा किंवा जास्त शेर असू शकतात . दोन ओळीचे शेर , त्यात आपल्या मनाच्या संपूर्ण भावना प्रकट करणं खरोखरच कमालीचं काम आहे . मिर्झा गालिबच्या शायरीत फारसी – उर्दू शब्दांचा जास्त प्रमाणत वापर असला व ते शब्द कठीण असले तरी त्यात कल्पकतेची भरारी व विचारांची गंभीरता आणि खोलपणा जाणवतो . बऱ्याच वेळा एकाच शब्दाचा वेगवेगळा अर्थ जाणवतो आणि या मुळे शायरीचा एक वेगळाच प्रभाव पडतो .

पद्य साहित्यात मानाचे स्थान असलेले गालिब यांनी जुनी दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मिर्झा गालिब यांचा मृत्यु १५ फेब्रुवारी १८६९ मध्ये झाला. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्या घराला ‘गालिब मेमोरिअल’मध्ये रुपांतरीत केले गेले. या मेमोरिअलला ‘गालिब की हवेली’ म्हणूनही ओलखले जाते. इथे कायम गालिब यांच्या संबंधातील प्रदर्शन सुरु असतात.

मिर्झा गालिब यांचे शेर

(1) ” बस कि दुश्वार है , हर काम का आंसा होना आदमी को भी मुयस्सर नहीं , इनसां होना ! ” – या शेरमध्ये गालिबने फार सोप्या शब्दात फार मोठा अर्थ सांगितलेला आहे . प्रत्येक काम सोपं असणं फारच अवघड . याचं प्रमाणे म्हणजे , माणूस दिसण्यात फार साधारणच दिसतो पण खऱ्या अर्थाने माणुसकी असणारा माणूस बनणं फारच अवघड असतं .

(२) ” थी खबर गर्म , कि ‘ गालिब ‘ के उडेंगे पुर्जे देखने हम भी गये थे , पर तमाशा न हुआ ! ” – हा शेर व्यंगात्मक आहे . ही बातमी सर्वांजवळच पोहोचलेली होती की आज ‘ गालिब ‘ ची खूप थट्टा केली जाणार आहे . त्याला खूप अपमानित केले जाणार आहे . म्हणून आम्ही ( गालिब ) पण तेथे गेलो . पण तिथं या उलटच झाले . अर्थात कोणाचेही गालिबची थट्टा किंवा अपमान करण्याचे धाडस नव्हते . स्वत:च्या थट्टेचा व अपमानाचा तमाशा बघायला न मिळाल्याने गालिबचा विरस झाला .

(३) ” घिसते घिसते मिट जाता , आपने अबस बदला नंगे सिज्दा से मेरे , संगे आस्ता अपना !! ” – मी जो तुझ्या उंबरठ्याच्या दगडावर रोज येऊन आपलं डोकं घासत होतो त्या कारणास्तव तू तो दगड विनाकारण फुकटातच तिथून काढवून टाकला . उंबरठ्याचा तो दगड तर माझ्या रोज डोकं घिसण्याने एक दिवस तसाही आपोआप संपणारच होता आणि तुलाही दगड हलविण्याचा उगाच त्रास झाला नसता . अर्थात रोज रोज डोकं घिसण्याने दगड विरघळू शकतो पण माणसाचे कठोर हृदय विरघळत नाही . या शेर मध्ये समर्थांची संपन्नता आणि असमर्थतेच्या विप्पनतेचे द्वंद आहे .

(४) ” उम्र भर देखा किए , मरने की राह, मर गए पर , देखिए , दिखालाए क्या ? ” – याचा एक अर्थ असा की आयुष्यभर मृत्यूची वाट बघितली पण मृत्यूनंतर दाखविण्यासाठी असं काय शिल्लक उरलं ? म्हणजे प्रेयसीने आयुष्यभर मला मृत्यूचा मार्ग दाखीविला पण आता ती मृत्यू नंतर मला काय दाखवू शकते ? एक दुसरा अर्थ असा की मृत्यूनंतर माणसाच्या आयुष्यात बघण्यासारखे व दाखविण्यासारखे काय शिल्लक राहते ?

(५) ” मुहब्बत मे नही है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते है , जिस काफिर पे दम निकले !! ” – ज्या प्रेयसीला पाहून जगण्याचे स्वप्न पाहतो त्याच प्रेयसीसाठी जीव देण्याची तयारी असते . म्हणूनच प्रेमात जगण्या मरण्याचा अंतर उरत नाही . याचा एक अर्थ असा की प्रेम विचार करून होत नसतं . या शेरचा एक अर्थ असा ही आहे की कधीकधी क्षणात घडलेल्या गोष्टींसाठी आयुष्यभर देखील किंमत मोजावी लागते .

(६) ” दुश्मनी ने मेरी खोया गैर को किस कदर दुश्मन है देखा चाहिये !! ” — परक्या माणसाला माझ्याशी वैर होते . पण माझ्या शत्रुत्वात मला त्रास देण्यात तो इतका दंग झाला की तो स्वत:लाच विसरला . तात्पर्य शत्रुत्व बाळगल्या मुळे आणि माझा सूड घेण्याच्या नादात तो स्वत: स्वत:चाच वैरी झाला .

(७) ” जिस जख्म की हो सकती हो तदबीर , रफू की लिख दिजियो , यारब उसे किस्मत मे अदू की !! ” – मित्रा ( ईश्वर ) जे घाव रफू केल्याने , अर्थात थोडेसे प्रयत्न केल्याने विसरता येतात आणि मग आयुष्य मार्गी लागतं , असले सर्व घाव माझ्या वैऱ्यालाच दे . जे जखम रफू करता येत नाही , अर्थात ज्या जखमांना विसरता येत नाही त्या सर्व जखमांना तू मलाच दे . मी त्या जखमांना आयुष्यभर माझ्या हृदयात बाळगण्यासाठी सक्षम आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar

नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…

News Desk

कपिल शर्मा आणि चाहते

swarit