HW News Marathi
मनोरंजन

नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…

नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नारायण सुर्वे यांच्या वरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता, त्यांनी आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाच्या कविता लिहिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणला मात्यापित्यांचे छत्र दिले, त्यांना चौथी पर्यंत शिक्षण दिले. त्या पुढचे शिक्षण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले. तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे.

त्यांच्या काही निवडक कविता :

सत्य

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;

तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .

पलिकडे खड़खड़नारे कारखाने

खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने

मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र

काटे ओलांडित चालले प्रहर

भावंडासह कोनाडा जवळ केला आईने

घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;

तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ

खपत होतो घरासाठीच …..

विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर

तुझ्या खांद्यावर —

तटतटलीस उरी पोटी

तनु मोहरली गोमटी

एक कौतुक धडपडत आले ; घरभरले

हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी

वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;

तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन

पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन

कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

‘नारायणा’ – गदगदला.

‘शिंक्यावरची भाकर घे ‘ पुटपुटला .

‘ उद्यापासून तिलाही काम बघ बाबा ‘

गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .

तीच्या ओठावर ओठ टेकवून

बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,

तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले ………. अधिकच..

तेव्हा एक कर!

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

असं पत्रात लिवा

तुम्ही खुशाल समदी हावा , असं पत्रात लिवा।।

कोण्या मेल्यानं तुम्हा कळविलं, मी ठुमकते रस्त्यावर

संशय माझा आला तर , नाही जाणार मी बाहेर

पाणी आणाया जाउ का नको, काय ते पत्रात लिवा।।

शंभर रूपायचा हिषोब मागता , मी काय एकटीनं खाल्ले

लाईटचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले

दूधवाल्याचे पन्नास देउ का नको , काय ते पत्रात लिवा।।

बाळाला आला ताप अन् खोकला, प्रायवेटला घेउन गेले,

त्याला जे. जे. ला नेउ का नको, काय ते पत्रात लिवा।।

बेबीला आताशा शाळेत घातलय, अभ्यास चांगला करते

आयाबायांनी शिकायला पायजे, वस्तीच अख्खी बोलते

मी बी शिकायला जाउ का नको, काय ते पत्रात लिवा।।

जवापासून तुमी गेला परदेषी, माजलेत इथे लफंगे

घडून मिळून राह्याच सोडून, धर्माच्या नावावर दंगे

समद्या वस्तीला समजावू का नको, काय ते पत्रात लिवा।।

नारी मुक्तीच्या मरतात सभा, मीटींगला आम्ही जातो

बहिणीला तुमच्या मारतो नवरा, सगळयाजणी धमकावतो,

तिला सोडवाया जाउ का नको, काय ते पत्रात लिवा।।

कोण्या मेल्यानं तुम्हा कळीवलं मी ठुमकते रस्त्यावर,

मीटींगला जाते, मोच्र्याला जाते, त्याविना कसं जमणार,

या तुमीबी साभ द्यायाला, असं पत्रात लिवा।।

इतका वाईट नाही मी

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला महोत्सवाचे आयोजन 

News Desk

डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

swarit

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक

swarit