HW News Marathi
क्रीडा

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली | भारताचे राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्‍ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला व्हेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भारतात क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येतो. गेल्‍या काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देशातील क्रीडापटूंना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २० सप्टेंबर रोजी विविध क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या सर्व क्रीडापटूंना आज राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सन्मान प्राप्त झालेला विराट कोहली हा तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी सचिन तेंडूलकर आणि एम.एस. धोनी याना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेले क्रीडापटू

भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जिन्सन जॉन्सन, हिमा दास, बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी, बॉक्सर सतीश कुमार, महिला क्रिकेटर स्मृती मंधाना, गोल्फपटू शुभंकर शर्मा, हॉकीपटू मनप्रीत सिंग, सविता, पोलो खेळाडू रवी राठोड, नेमबाज राही सरनोबत, अंकूर मित्तल, श्रेयासी सिंग, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा, जी. सथीयान, टेनिसपटू रोहन बोपण्णा, कुस्तीपटू सुमीत, वुशू खेळाडू पूजा कंदियन, पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू अंकूर धर्मा, मनोज सरकार अशा एकूण २० क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेले क्रीडापटू

बॉक्सर कुटप्पा, वेटलिफ्टर विजय शर्मा, टेबिल टेनिसपटू श्रीनिवास राव, ॲथलेटिक्स खेळाडू सुखदेव सिंग पन्नू या चार क्रीडापटूंना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related posts

भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्या हाती भाजपचा झेंडा

swarit

भारत-वेस्ट इंडिज सामन्यामध्ये भारताचा विजय

News Desk

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk