वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि अॅना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपंण्यास अवकाश होता. पुरेश्या वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.
योगायोगाने त्याच वेळी सीझर ऑगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठयात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतानी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेढपाळानी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले. तर हेरोद राजाचे धाबे मात्र दणाणले. अशा प्रकारे कितीतरी वर्षापूर्वी विविध भविष्यवाद्यांनी जुन्या करारात केलेले भाकीत पूर्ण झाले. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. यहुद्यांच्या वंशास तारणारा जन्मास येईल. तो दाविदाच्या घराण्यात जन्म घेईल. ख्रिस्तजन्मापूर्वी मिखा भविष्यवाद्याने देखील हेच भविष्य सागितले होते.
“क्रिसमस” किवा “ नाताळ” हा सण प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मुळीच अस्तित्वात नव्हता. खरे पाहता पूर्वी येशूजन्माचा उत्सव मागी लोकांच्या आगमनापर्यंत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई. पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ. सन ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली. परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठे होऊ लागतात. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत. कॉन्स्टन्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्तसभेत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत “ नातालीज सोलिस इनइक्विटी” म्हणजे अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस असें म्हणत. त्यावरून या उत्सवाला नाताळ असें नाव पडले. संत क्रिजोस्तम तर म्हणत, “ आपल्या प्रभूवाचून आणखी दुसरा अजिंक्य देव तो कोण आहे ? तो तर न्यायाचा सूर्य आहे. “
कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली. असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५मध्ये आढळतो.’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.