HW News Marathi
संपादकीय

…तर मोदींना चढावी लागेल मातोश्रीची पायरी ?

पूनम कुलकर्णी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २०१४ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्यात आली. महाराष्ट्रातली ही चौदावी विधानसभा निवडणूक होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात एकाच फेरीत ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी निवडणुका झाल्या. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. तर शिवसेनेला ६३, काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांनी आपली आघाडी मोडीत काढून निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना ह्यांची २५ वर्षाची युती तुटली. यानंतर महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत पहायला मिळाली. सेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे निवडणुकीनंतर युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीची रणधुमाळी शांत होताच सत्तास्थापनेसाठी सेना भाजपने एकत्र येत महाराष्ट्रात युतीकरत सरकार स्थापन केले.

जागा वाटपावरुन नाराज असलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपाला साथ दिली. परंतु अद्याप ती नाराजी तशीच असल्याचे कुठे तरी पहायला मिळते. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री तर राज्यातले दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले. फडणवीसांचा शपथ विधी सोहळा मोठ्या थाटात मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडला. या सोहळ्याला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजून महाराष्ट्रात चक्क भाजप पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेत आले.

या दिमाखदार सोहळ्याला मोठ्या थाटात सुरुवात झाली. परंतु सत्तेत मित्र पक्ष म्हणून सहभागी असलेले शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे मात्र वेळेत उपस्थित राहिले नाहीत. बराच वेळ उलटला तरीही उद्धव ठाकरे आले नसल्याने ठाकरे सोहळ्यात सहभागी होणार का असा संभ्रम उपस्थित नेत्यांमध्ये निर्माण झाला. परंतु काही वेळातच ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैलीत या सोहळ्याला उपस्थिती राहिले. उशीरा का होईना पण शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजप नेत्यांसह पंतप्रधानांनी काही अंशी दुर्लक्ष केले. पंतप्रधांनाचे उद्धव यांच्याकडे झालेले दुर्लक्ष अद्याप सेना भाजपमधील तणावाचे कारण ठरले….

सेनाभाजपमधील तणावाला सुरुवात

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन झालेल्या सेना-भाजप मधील वादामुळे २५ वर्षे जुन्या युतीला तडा गेला. या तणावाला काही अंशी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे जबाबदार असल्याचेही बोलले गेले. परंतु निवडणुकीनंतर सत्ता प्रस्थापित करताना सेना-भाजप एकत्र आल्याने महाराष्ट्रात सेना-भाजपचे संयुक्तीचे सरकार स्थापन झाले. मात्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्यामुळे उद्धव ठाकरे मात्र शेवटपर्यंत नाराज असल्याचे चित्र दिसून आले. तेव्हापासून ख-या अर्थाने सेना भाजपमधील तणावाला प्रारंभ झाला.

सेनाभाजपत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, ठाकरेंना शेलारांचे उत्तर

राज्यात सेना-भाजपच्या युतीनंतर सत्ता स्थापन झाली खरी परंतु छोट्या-छोट्या बाबींमध्ये अनेकदा सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून अनेकदा भाजपवर उद्धव ठाकरे निशाना साधू लागले. परंतु उद्धव यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मात्र भाजपकडून मुंबई अध्यक्ष अशिष शेलार बोलत असत. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या वादाला तोंड फुटले. शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून उद्धव यांना भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडून उत्तर देण्याची अपेक्षा वाटत असे परंतु उद्धव यांचा मान न राखता त्यांना मुंबई अध्यक्ष शेलार उत्तर देत असत. त्यामुळे सेना-भाजपतील तणाव वाढत गेला.

बाळासाहेबांच्या वक्तव्याने मोदी दुखावले ?

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान व्हावे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत आपले मत मांडले होते. कालांतराने नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करावे, यासाठी पक्षातील विविध नेत्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या पारड्यात आपले मत टाकले होते. त्यावेळी सुषमा स्वराज याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीच्या योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले होते.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांच्याच नावाला पसंती दिली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी सुयोग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते. बाळासाहेबांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान होऊनही मोदी शिवसेनेवर नाराजच राहीले.

ठाकरे आणि शहा भेटीचा रिझल्ट मात्र शून्य

जवळपास ४ वर्षे रडतखडत एकत्र काढल्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सेना-भाजपतील तणाव चव्हाट्यावर आला. दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने तिकीट दिल्यामुळे सेना-भाजपत पुन्हा एकदा राजकीय वितुष्ट पहायला मिळाले. परंतु या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित निवडून आल्यामुळे सेना-भाजप युती तुटणार की काय असे वाटू लागले आणि अखेर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकला चलोचा नारा दिला. मात्र युती तोडली नाही. अगामी निवडणूक स्वबळावर लढू असे म्हटलेल्या उद्धव यांना भेटण्यासाठी संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव यांची भेट घेतली पुन्हा एकदा सेना-भाजपत सर्व काही अलबेल होईल असे वाटत असताना दुस-याच दिवशी खासदार संजय राऊत यांनी या पुढे युती नाही असे जाहीर केले. त्यामुळे एकूणच शहा उद्धव भेटीचा रिझल्ट मात्र शुन्यच लागला.

मोदी मातोश्रीवर येणार का ?

पंतप्रधान मोदींनी जर आगामी निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले तर कदाचित गेल्या ४ वर्षात सेना भाजपात असलेला तणाव काही अंशी मिटण्याची शक्यता आहे. परंतु आगामी निवडणुकीत युती टिकविण्यासाठी मोदी मातोश्रीची पायरी चढणार का हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युतीचे शाब्दिक युद्ध …

swarit

जिओ इन्स्टिट्यूटचा दर्जा एफटीआयआय (FTII) पेक्षा मोठा ?

swarit

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची स्वतंत्र भारतात घुसमट

News Desk