HW News Marathi
शिक्षण

महापुरुषांना विशिष्ठ जातीत बंदिस्त करू नये –  डॉ. कोत्तापल्ले  

उत्तम बाबळे

नांदेड :- आजच्या काळात प्रत्येक समूहाच्या जातीय अस्मिता प्रबळ होत आहेत त्यामुळे अनेक महापुरुषांना आपापल्या जातीत बंदिस्त करण्याचा दुर्दैवी प्रयत्न सुरु आहे. अशावेळी जातीच्या कोशातून महापुरुषांना मुक्त करायला हवे व अण्णा भाऊ साठे यांसारख्या महापुरुषांना विशिष्ठ जातीत बंदिस्त करु नये असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जनवादी साहित्यिक: अण्णा भाऊ साठे’ या अभिवादन ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. जी. एन. शिंदे, प्र. कुलसचिव डॉ. आर. एम. मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुते आणि ग्रंथाचे संपादक डॉ. पी. विठ्ठल व डॉ. राजेश्वर दुडुकनाळे, उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाकडे प्रारंभीच्या काळी प्रस्थापित लोक आस्थेने बघत नव्हते, मात्र जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसे अण्णा भाऊंच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. अण्णा भाऊ साठे यांनी जे जगणं कधीच साहित्यात आले नव्हते अशा वेगळ्या जगाचे समर्थपणे चित्रण केले. कधीकाळी मराठी साहित्य सदाशिवपेठेच्या पलीकडे जात नव्हते. मात्र अण्णा भाऊंमुळे कष्टकरी, झोपडपट्टीतल्या माणसाचे दुःख साहित्यात आले. विशिष्ट्य अशी जीवनदृष्टी घेऊन ते लिहीत होते. एवढेच नव्हे तर दलित साहित्याचा उगम बघायचा असेल तर अण्णा भाऊंच्याच साहित्यात तो बघता येतो. कारण गरीब माणूस कसा जगतो, तो विचार कसा करतो? त्याचे प्रश्न काय आहेत? याचे भान अण्णा भाऊंना होते. मात्र दर्जेदार लेखन करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. अर्थात हे प्रत्येक काळात घडत असतेच. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही समाजाने उपेक्षा केली होतीच. मात्र मोठी माणसं आपल्या काळापुरतं बघत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रासंगिकता नंतर अधोरेखित होत जाते. असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, अण्णा भाऊंनी साहित्य मूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही. म्हणून त्यांच्या साहित्याची भाषा अस्सल होती. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य परिणाम कारक आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रस्ताविक केले. तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडुकनाळे यांनी आभार मानले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन” कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

माजी सैनिकांच्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मिळणार

News Desk

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk