HW News Marathi
मनोरंजन

अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण

मुंबई | मराठी सिनेसंगीताच्या आकर्षणाने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गुणी गायक व संगीतकारांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक. आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेल्या अनु मलिक यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील ख्यातनाम संगीतकार सरदार मलिक यांच्या कडून मिळाला. १९८० साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनु मलिक यांच्या संगीताची खासियत आहे. आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा असते. ‘बॉर्डर’, ‘बाजीगर’ ’विरासत’, रेफ्युजी, ‘बादशहा’, जुडवाँ, ‘मै हूँ ना’, ‘शूट आउट अॅट वडाला’, ‘दम लगाके हैशा’, ‘यमाला पगला दिवाना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘उँची है बिल्डींग’, ‘गरम चाय की प्याली हो’, ‘जानम समझा करो,’ ‘ज्युली ज्युली’, ‘मै खिलाडी तू अनाडी’ ही त्यांनी गायलेली गाणी सुद्धा सुपरहिट झाली.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनु मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि आशा भोसले ही तर त्यांची दैवतचं आहेत, पण त्याचसोबत सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान गायक-संगीतकरांचेही ते चाहते आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या मराठी कलाकारांबद्दल ही त्यांच्या मनात आदर आहे.

अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ‘आसूड’ हा चित्रपट भाष्य करत असल्याने विषयाची खोली लक्षात घेता तशाप्रकारचं संगीत देणं अपेक्षित होतं. यातील गाणी व संगीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार असून आपल्या मराठी पदार्पणाबद्दल अनु मलिक सांगतात की, ‘मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, ‘आसूड’ च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. ‘आसूड’ साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता’. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल असा विश्वास अनु मलिक यांनी व्यक्त केला.

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटात एका युवकाचा व्यवस्थेविरोधातील लढा दाखवताना शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती दिपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताळे यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश जळमकर व अमोल ताळे यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय निर्मितीच्या ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ लघुपटाला ऑस्कर

News Desk

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

News Desk

मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत होणार मराठी चित्रपट

News Desk