मुंबई | कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबुल येथे झाला. १९७३ मध्ये त्यांनी ‘दाग’ चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कादर खान यांनी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या ‘जवानी-दीवानी’ या चित्रपटासाठी संवादलेखन केले होते. कादर खान यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासह पटकथा लेखक म्हणून अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. कादर खान यांनी विनोदी भूमिकांपासून खलनायकापर्यंत सर्व भूमिका उत्तमरीत्या वठविल्या.
अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर, देशप्रेमी, सुहाग, हे मनमोहन देसाई-कादर खान या जोडीचे चित्रपट प्रचंड गाजले. तर मेहरा-कादर खान यांच्या जोडीने ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर या प्रसिद्ध चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले होते. कादर खान हे जितके उत्कृष्ट आणि सच्चे अभिनेते होते तितकेच उमदे संवाद लेखक होते.‘हो गया दिमाग का दही’ हा कादर खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
३ वेळा ठरले फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी
कादर खान यांनी तब्बल ३०० चित्रपटांत काम केले असून २५० हूनही अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले. कादर खान यांना ३ वेळा फिल्मफेअर पुरस्कारने आणि २०१३ साली साहित्य शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिम्मतवाला या चित्रपटापासून कादर खान यांनी विनोदी भूमिका साकारायला सुरुवात केली. कादर खान यांचे ‘घर परीवार, दुल्हे राजा, बडे मिया छोटे मिया, अनाडी नंबर १’ हे चित्रपट प्रचंड गाजले आहे. २००१ साली खान यांनी ‘हसना मत’ या टेलिव्हीजन सिरियलमधून छोट्या पडदयावर पदार्पण केले आहे.
करिअरची सुरुवात कब्रिस्तानातून
कादर खान यांची आई त्यांना नमाज पठणासाठी मशिदीत पाठवित असे. मात्र कादर खान हे मशिदीत न जाता त्याच्या बाजूला असलेल्या कब्रिस्तानमध्ये जात असत. येथे ते तासंतास काही काही बडबडत बसत असत. तेव्हा त्याचे वय अवघे ८ ते ९ वर्षे होते. १९४२ साली प्रदर्शित झालेल्या ‘रोटी’ या चित्रपटातील अभिनेते अशरफ खान हे रोमिओ-ज्युलियटवर एक नाटक बसवित होते. या नाटकातील एका भूमिकेसाठी त्यांना आठ-नऊ वर्ष वयाच्या अशा मुलाची गरज होती ज्याची स्मरणशक्ती उत्तम असेल. कारण या भूमिकेसाठी जवळपास ४० पानांचे स्क्रिप्ट होते.
अशरफ यांना कादर खान यांच्याविषयी समजल्यानंतर त्यांनी बरेच दिवस कब्रस्तानमध्ये जाताना कादर खान यांचा पाठलाग केला. अखेर एके दिवशी त्यांनी आपल्या नाटकात अभिनय करण्यासाठी कादर खान यांना विचारले. कादर यांना अभिनयाबाबत फारसे माहिती नसल्याने अशरफ यांनी कादर यांना अभिनयाचे धडे दिले. एका महिन्यानंतर त्या नाटकात कादर खान यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद देत. कादर खान यांच्यासाठी प्रेक्षक चक्क उभे राहून टाळ्या वाजवीत असतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.