HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या…का साजरा केला जातो जागतिक चहा दिवस

मुंबई | आज जागतिक चहा दिवस…. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं आणि अमृततुल्य मानलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा…चौकामध्ये कुठेतरी एक टपरी, त्यावर रॉकेलचा स्टोव्ह, त्यावर एक चहाची किटली हीच काय ती चहाच्या दुकानांची पूर्वीची ओळख. मात्र जसजशी हॉटेल संस्कृती हायटेक रूप धारण करू लागली तशी चहाची दुकानेही बदलू लागली. अलीकडे चहाची दुकाने ही आकर्षक, रोषणाईने फुललेली, हटके रूपात दिसू लागली आहेत. त्यामध्ये चहाच्या कपांपासून ते दुकानांच्या पाट्यांपर्यंत आकर्षक रूप आल्याने उच्चभ्रू ग्राहकही त्याकडे आकर्षित होत आहेत.

थंडीत भरलेली हुडहुडी असो की, कामात आलेला आळस घालवायचा असो, चहा हा प्रत्येकाला हवाच असतो. त्यामुळे ‘चहाला कोणतीही वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवाच’, अशा प्रकारे आकर्षक टॅगलाईन देऊन ग्राहकांना आवाहन केले जाते. जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी २००५ पासून १५ डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, टांझानिया आणि भारतातही साजरा होतो. जागतिक चहा व्यापाऱ्यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे हा मुख्य हेतू हा दिवस साजरा करण्यामागचा आहे.

२००४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड सोशल फोरमच्या चर्चासत्रात हा दिवस २००५ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्याचे ठरले. नंतर २००६ आणि २००८ मध्ये श्रीलंकेत जागतिक स्तरावर चहा दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनांमार्फत चहा दिवस जागतिक स्तरावर पोहोचवण्यात यावा असा प्रस्ताव २०१५ साली भारताकडून मांडण्यात आला. भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांतही चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते.

सीटीसी चहा

सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात किंवा हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात त्यानंतर त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुगंध वाढतो. मात्र हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही.

ग्रीन टी

या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंटच प्रमाण अधिक असतं. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप हितकारक असतो. विशेषत: हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गेनिक चहा तयार केले जातात.

हर्बल टी

ग्रीन टीमध्ये तुळस, अश्‍वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी असतो. औषध म्हणूनही याचा वापर केला जातो.

ऑर्गेनिक टी

ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो.

व्हाईट टी

चहाच्या कोवळ्या पानांपासून हा चहा तयार केला जातो. हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. त्याचा हलका गोड स्वाद अतिशय चविष्ट असतो. यामध्ये कॅफिन खूप कमी आणि अँटी ऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. एक कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते. तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफिन असते.

ब्लॅक टी

कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

इन्स्टंट चहा

या प्रकारात टी बॅग्ज येतात. पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्जमध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते, हे नैसर्गिक अ‍ॅस्ट्रीजेंट असून यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग्ज सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात.

लेमन टी

लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.

मशीनचा चहा

अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. चहा पिण्याचे समाधान मात्र या चहातून काही मिळत नाही. कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो.

वरील सर्व चहा बरोबरच अजून काही प्रकार सध्या प्रचलित आहे. रिजूविनेटिंग टी, स्लिमिंग टी, आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात. उदाहरणार्थ दालचिनी, तुळस वगैरे. दालचिनीमुळे ताजेतवाने वाटते तर तुळशीमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. स्लिमिंग टीमध्येही वजन कमी करण्यास मदत करणारे घटक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk

आगमन बाप्पाचे | ‘श्री’रंगी रंगल्या बाजारपेठा

swarit