HW News Marathi
मनोरंजन

सचिन… सचिन….

सचिन परब

परवाचीच गोष्ट. मुंबई विरुद्ध पुणे आयपीएलची फायनल होती. मुंबई १२९ रन वर आऊट झाली होती. मध्यंतरातल्या चर्चेत अँकर गौरव कपूरने शेवटचा प्रश्न अजय जडेजाला विचारला, आता तुम्ही कोणत्या बाजूने. जडेजाने नुकतीच मुंबई इंडियन्सवर कडक टीका केली होती. तरीही जडेजाचं उत्तर होतं, तो सचिन तेंडुलकर नावाचा माणूस मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलाय, तोवर दुसऱ्या कुणाचा विचारही नाही करू शकत.

जडेजा तसा सचिनपेक्षा दोन वर्षांनी मोठा. तरीही तो सचिननंतर तीन वर्षांनी पहिली इंटरनॅशनल मॅच खेळला. तो रिटायर्ड झाल्यानंतरही सचिन तेरा वर्षं खेळत राहिला. सचिन शेवटची टेस्ट खेळलेल्यालाही आता साडेतीन वर्षं झालीत. जडेजाने सचिनला जवळून पाहिलंय. सचिनचं चांगलं वाईट त्याला माहीत असणारच. तरीही जडेजाच्या डोक्यातलं सचिनचं वेड काही जाताना दिसत नाही. ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार बहुतेक. एकट्या जडेजाच्या नाही तर सचिनला पाहत मोठ्या झालेल्या सगळ्या पिढीचंच वेड आहे ते. तो त्यांच्या जिवंत असण्याचाच एक भाग आहे. त्याला वेगळं करता येणं कुणालाच शक्य नाही. सचिनलाही.

त्या वेडाचाच भाग असलेला सचिनचा सिनेमा सध्या सुरूय. ‘सचिनः अ बिलियन्स ड्रीम’. सिनेमा कसला डोंबलाचा? डॉक्युमेंट्री आहे ती. फार तर डॉक्युड्रामा म्हणता येईल. डॉक्युमेंट्री थिएटरला दाखवायची पद्धत नाही आपल्याकडे. ती फेस्टिवलांमध्ये दाखवतात. फुटकळ चार दोन स्क्रीनिंग होतात त्याचे. मग यूट्यूबवर बघायची असते ती. पण ही सचिनची डॉक्युमेंट्री सध्या हाऊसफुल्ल आहे. पहिल्या चार दिवसातच त्याच्या कमाईने २०१७च्या सर्वात यशस्वी दहा बॉलीवूड सिनेमांमध्ये जागा मिळवलीय. गेल्या आठवड्यात सर्वात जास्त गल्ला जमवणारी फिल्म ठरलीय ती.

गोष्ट खरी असली, माणसं खरी असली तरी आम्हाला खऱा सिनेमा नाही चालत. आम्हाला त्यात मसाला लागतो, मेलोड्रामा लागतो, रोमहर्षक वगैरे क्लायमॅक्स लागतो. गाणी, डायलॉग, कॉमेडी तर पायजेच. कधीतरी पंचवीसेक वर्षांपूर्वी अश्विनी नाचप्पावरचा ‘अश्विनी’ हा तेलुगू सिनेमा आला होता. तेव्हापासूनचा इतिहास साक्षी आहे. ‘चक दे इंडिया’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘पान सिंग तोमर’, ‘मेरी कोम’, ‘बुधिया सिंगः बॉर्न टू रन’, ‘अजहर’, ‘सुलतान’, ‘दंगल’, ‘एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ किंवा या यादीत राहून गेलेला कोणताही बायोपिक, खेळाडूंचा चरित्रपट काढून बघावा. मालमसाला लागतोच.

आपल्याला सिनेमा बघताना लागतं ते सगळं सचिनच्या गोष्टीत मुळातूनच होतं. वडील कवी असल्यामुळे गाण्याची जागा. ‘जो जिता वहीं सिकंदर’ला मागे टाकेल अशी भावंडभावना. अब्दुल कादिरबरोबर झालेली डायलॉगबाजी. लव अट फर्स्ट साइट. इंटरकास्ट, इंटरकल्चरल, वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न. कॅप्टनशिपमधल्या अपयशात अझरुद्दीनला, नंतर ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुलीला व्हीलन बनवण्याची नामी संधी. चाहत्यांचे कमाल किस्से. प्रचंड लोकप्रियता. वर्ल्ड कप विजय, नॉट आऊट दोनशे, शंभरावी सेंच्युरी, भारतरत्न असा कडक क्लायमॅक्स. एका आठवड्यात हंड्रेड क्रोर क्लबमध्ये जाण्याची खात्री. तरीही सचिनने या सगळ्याला नाही म्हटलं. कोणतीही अतिशयोक्ती नको, ही त्याची पहिली अट होती. त्याचा आजवरचा असा वेडेपणा त्याच्या प्रोफेशनल प्रामाणिकपणामुळे यशस्वीही झालाय. त्याच्या चाहत्यांनी या डॉक्युमेंट्रीला यशस्वी सिनेमा करून दाखवलंय. त्यांनी जणू ठरवलंच होतं आपल्या सचिनचा सिनेमाही मागे पडता कामा नये.

सचिनचे चाहते असेच आहेत. सचिनने त्यांना फक्त आनंदाने जगण्याचे काही क्षण नाही दिलेले. सचिनने त्यांच्या आकांक्षांना आत्मविश्वास दिलाय. समोर सगळे आऊट होत असले तरी एकट्याने जग जिंकण्याचं बळ दिलंय. १९९१ नंतर जागतिकीकरणासोबत मोठी झालेली पिढी नवी स्वप्नं पाहू लागली. त्या स्वप्नांचा नायक सचिन होता. वाढणारी बाजारपेठ, वाढणारा मध्यमवर्ग आणि वाढणारी शहरं सचिनमध्ये स्वतःला शोधत होती. जगाच्या पावलांवर पावलं टाकत भारत तेव्हा आपली गुणवत्ता सिद्ध करत होता. तेव्हा नुसती आक्रमकता चालणार नव्हती. त्याला शालीनतेची जोड हवी होती. त्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन सचिनकडे होतं. सचिन, सौरव, धोनी आणि विराट हे भारतातल्या बदलणाऱ्या पिढ्यांच्या वाढत्या आक्रमकतेचे प्रतिनिधी आहेत. सचिन नसता तर पुढच्या पिढ्या इतक्या टेचात वावरू शकल्या नसत्या. पश्चिमेकडून आलेली कॉर्पोरेटी बाजारपेठ प्रचंड वेगाने धडका मारत असताना भारतीयपणा टिकवून त्यावर स्वार होता येतं, हे सचिन सांगत होता. तो जगाचा असतानाच छान भारतीय राहिला, मराठी राहिला. डॉक्युमेंट्रीत त्याच्यावर ‘मर्द मराठा’ असं गाणंही आहे. ते कुणालाच टोचत नाही. त्याच्या ‘आयला’सकट, त्याच्या मराठीपणासकट त्याला जगाने स्वीकारलं. टोकदार न होता अस्मिता कशा सांभाळाव्यात ते तो दाखवून देत होता.

या डॉक्युमेंट्रीत सचिनविषयी भरभरून सांगायला सगळे येतात. येत नाही तो आपला विनोद कांबळी. ही विजयगाथा सचिन आणि विनोद या दोघांची असती तर मजा डब्बल झाला असता. सचिनच्या यशाची कारणं या डॉक्युमेंट्रीत दिसत जातात. चंदू बोर्डे आणि विजय हजारे या ख्रिस्ती दलित कसोटीपटूंचा अपवाद वगळला तर भारताच्या इतिहासातला पहिला दलित कसोटीपटू असणाऱ्या विनोदच्या अपयशाची वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, सगळी कारणं शोधायची गरज आहे. सचिनचं यश जे सांगत नाही ते विनोदचं अपयश सांगू शकतं. ते विनोदनेच बिलियन्सच्या अपुऱ्या स्वप्नांच्या कहाणीतून सांगायला हवं.

अर्थात सचिन सगळ्याच बाबतीत आदर्श नाही. सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्यायला पाहिजे होतं का? भारतरत्न मिळाल्यानंतरही त्याने अंबानीच्या टीममध्ये खेळायला हवं होतं का? त्याने राज्यसभेत खासदार बनायला हवं होतं का? खासदार बनल्यावर गैरहजर राहण्याची चूक करायला हवी होती का? त्याने संघाच्या विजयापेक्षा स्वतःच्या विक्रमांची जास्त काळजी घेतली का? कॅप्टनशिपमध्ये तो अपयशी का ठरला? जाहिरातींतून वेळ काढून क्रिकेट खेळावं इतक्या जाहिराती त्याने का घेतल्या होत्या? सर्वात प्रमुख खेळाडू असूनही त्याला भारतीय संघाला लागलेली बेटिंगची कीड कळू शकली नाही का? त्याचा सिनेमा आल्यानंतर त्याने तो टॅक्स फ्री करून घ्यायची गरज होती का? सचिनविषयी हे आणि असे अनेक प्रश्न विचारता येऊ शकतात. किंबहुना विचारले गेलेच पाहिजेत. पण ही डॉक्युमेंट्री सचिनच्या विजयाचा पोवाडा आहे. त्यात त्याची जडणघडण आलीय, विश्लेषण नाही. त्यामुळे अनेकांना ती आवडणारही नाही. तरीही त्यातला एक तुकडा आवर्जून बघायला हवा. सचिनचा पहिला दौरा, पाकिस्तानचा. सियालकोट कसोटीत त्याच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असणाऱ्या आणि सचिनसारखीच पहिली सिरीज खेळणाऱ्या वकार युनूसच्या बाऊंसरने त्याचं नाक फोडलं. तरीही सचिन खेळला. तेव्हा त्याच्या नॉन स्टायकर एण्डला एकटा नवज्योत सिद्धूच नाही तर तेव्हाची सगळीच भारतीय पोरं प्रेरणा घेत उभी होती. अब्दुल कादिरचं चॅलेंज स्वीकारत त्याने ठोकलेले चार सिक्स आणि एक फोर. क्रिकेटमधल्या तेव्हाच्या महासत्तेला आव्हान देणारा सर्जिकल स्ट्राइक होता तो.

वकार तेव्हाच्या पाकिस्तानला दाखवू शकला नाही, तो रस्ता सचिनने भारताला दाखवून दिला. वैयक्तिक कितीही आदर असला तरी सत्यसाईबाबा आणि सिद्धिविनायक मैदानात न आणण्याचा हा धडा होता. ९२ साली पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकत होता तेव्हा आम्ही भारतात दंगली करत होतो. सचिनच्या पिढीने अनुभवाने शहाणं होत दंगलीच्या रस्ता सोडला दिला. तिथे अनाठायी अस्मितेपायी पाकिस्तान भारताने सोडलेल्या दंगलींच्या रस्त्यावर गेला. आज आपण सचिनचा सिनेमा अभिमानाने बघत आहोत. तिथे दाढी वाढवलेला अब्दुल कादिर ओळखताही येत नाही. वकार ऑस्ट्रेलियात स्थायिक झालाय. वकारने घडवलेल्या पिढीचा प्रतिनिधी असणारा मिसबाह उल हक पाकिस्तानच्या मैदानात एकही इंटरनॅशनल टेस्ट न खेळता निवृत्त झालाय.

आता पंचवीस वर्षांनंतर आपण देश म्हणून पुन्हा एकदा त्याच वळणावर उभे आहोत. पाकिस्तानसारखा धर्म मैदानात आणायचा की अब्जावधींच्या डोळ्यांतली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेला वापरून घ्यायचं, याचा निर्णय आपल्याला घ्यायचाय. सचिनची डॉक्युमेंट्री त्या निर्णयात आपल्याला थोडीफार दिशा दाखवू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk

सोनम कपूरच्या लग्नाची तारीख अखेर ठरली

swarit

#IndianNavyDay : समुद्री चाच्यांचे जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न फसले

News Desk