HW News Marathi
मनोरंजन

Anant Chaturdashi | बाप्पाचे हे वर्ष शंभरावे ! 

गौरी टिळेकर । दादरच्या सेनाभवन परिसरातील ‘इंद्रवदन सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ या वर्षी आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.१९१८ साली जेव्हा मारुती मास्तर नावाच्या गृहस्थांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली तेव्हा ही सोसायटी ‘तुळशीदास तेजपाल चाळ’ म्हणून ओळखली जात होती. कालांतराने या तुळशीदास तेजपाल चाळीचे रूपांतर इंद्रवदन सोसायटीत झाले. मात्र इथला गणेशोत्सव अखंड सुरु राहिला. गेली अनेक वर्षे गिरगावच्या मादुसकर आर्ट यांच्याकडून बाप्पाची दीड फुटाची शाडूच्या मातीची अत्यंत सुंदर आणि सुबक अशी मूर्ती घडवून आणली जाते. बाप्पाची ही लहानगी मूर्ती इंद्रवन सोसायटीच्या प्रांगणात घातलेल्या मांडवात मोठ्या थाटाने विराजमान होते. या बाप्पाचे आगमन आणि विसर्जन फुलांनी आकर्षकपणे सजविलेल्या एका सुंदर अशा पालखीतून दिमाखात करण्याची परंपरा आहे. चाळीतील सर्वच जण मोठ्या उत्साहाने, आनंदाने पारंपरिक पेहरावात, साज-शृंगार करून या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होतात.

बदलत्या काळाप्रमाणे चाळीने उत्सवाचे रूपही बदलले. नव्या कल्पना आणि विचारांसह सामाजिक भान जपत हा गणेशोत्सव साजरा होतो आहे. १९१८ साली जेव्हा या गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा त्याचे स्वरूप हे अत्यंत छोटे आणि साधे असे होते. सुरुवातीला कोहिनुर मिलच्या शेजारी असणाऱ्या एका बंगल्यात हा गणेशोत्सव साजरा होत असे. काही काळाने चाळीच्या प्रांगणातच मांडव घालून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली आणि बघता बघता या गणेशोत्सव मंडळाने आपली १०० वर्षे पूर्ण केली आहेत.

लोकमान्य टिळकांनी ज्या मूळ उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले तोच उद्देश घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न या मंडळाकडून वर्षानुवर्षे केला जात आहे. ज्या काळात हे गणेशोत्सव मंडळ सथापन झाले त्या काळात ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर व्याख्याने, प्रवचने, नाटकांचे अनेक प्रयोग होत असत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकेकाळी विष्णुबुवा निजामपूरकर, तांबेशास्त्री, नाना बडोदेकर, पं. वैजनाथशास्त्री आठवले, बाबामहाराज सातारकर आदी नामांकित विद्वानांच्या कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण चाळीला मंत्रमुग्ध केले. जुन्या काळी शाहीर मुळे आणि शाहीर खाडिलकर यांचे पोवाडेदेखील येथे सादर होत असत. अच्युत बळवंत कोल्हटकर, वामन मल्हार जोशी, विश्वनाथ गोपाळ शेटय़े यांच्या व्याख्यानांमुळे लोकांच्या ज्ञानात भर तर पडलीच पण त्याचबरोबर त्यांच्या विचारांची प्रगल्भतादेखील वाढली.

बदलत्या काळासोबत चालताना नव्या विचारांचा, नव्या कल्पनांचा स्वीकार केला असला तरी जुन्या विचारांचा, मूल्यांचा आणि उद्देशांचा विसर या मंडळाला पडलेला नाही, हे विशेष ! आपल्या परंपरांचा आदर करून, आपली संस्कृती जपून, त्यामागचा मुख्य उद्देश नेमका ओळखून सामाजिक जाण ठेवत गेली तब्बल १०० वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा सुवर्ण प्रवास असाच पुढेही वर्षानुवर्षे सुरू राहो !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndependenceDay | मी पंतप्रधान नव्हे तर, प्रधानसेवक !

News Desk

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna