HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. शरद पवार

स्वारातीमचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ २६ फेब्रुवारीला

शरदचंद्रजीपवार होणार आता ” डाॅ.शरदचंद्रजी पवार !”

उत्तम बाबळे

नांदेड : – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ रविवार, दि.२६ फेब्रुवारी, २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी कृषी मंत्री मा. शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

डी.लिट्. ही सन्माननीय मानद पदवी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वीच मा. शरदचंद्रजी पवार यांना देण्याचे जाहीर केलेले आहे. मा. शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेतीविषयक आणि इतर क्षेत्रांमध्ये बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची व्याप्ती खूप मोठी असून महाराष्ट्रातील आणि देशातील जनमानसावर त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटलेला आहे. त्यांचे जीवन हे सर्वांसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील या सुपुत्राचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी विशेष नाते असून विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विनंतीचा स्वीकार केल्यामुळे विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल.मा.शरदचंद्रजी पवार हे दि.२६ फेब्रुवारी पासून ” डाॅ.शरदचंद्रजी पवार “होणार असून त्यांचा सन्मान करीत असतांना विद्यापीठाचाही बहुमान होत आहे.

विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभामध्ये २४२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार असून ११८१२ विद्यार्थ्यांना पदवी, पदविकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेच्या ३५५६, कला शाखेच्या २८९५, वाणिज्य शाखेच्या २७२५, औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या १८५, विधी शाखेच्या ४५१, शिक्षण शाखेच्या ६९, शारीरिक शिक्षण शाखेच्या ६, व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या १६६, अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र शाखेच्या ११८४, सामाजिकशास्त्र शाखेच्या २३८, ललित कला शाखेच्या २, दूर शिक्षण शाखेच्या ५२ आणि एम.फिल. पदवीच्या ४१ विद्यार्थ्यांना पदवी, पदविकांचे वाटप करण्यात येणार आहे. मागील वर्षापर्यंत एकूण ३० सुवर्णपदकांस प्रायोजकत्व मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये अकरा सुवर्णपदकांची वाढ झालेली आहे. एकोणिसावा दीक्षान्त समारंभापासून ४१ प्रायोजक मिळाल्यामुळे ४१ सुवर्णपदकांचे वितरण होणार आहे.

उन्हाळी २०१६ च्या परीक्षेत विविध विषयात सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे. पीएच.डी.पदवी करीता आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभाच्या दिवशीच दुपारच्या सत्रामध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सर्व विद्याशाखेचे समन्वयक आणि विद्या परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. दीक्षान्त समारंभाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव भगवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती २४ सदस्यीय आहे. या समित्यांमध्ये विद्यापीठ परिसरातील संचालक, अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी काम करीत आहेत.अशी माहीती २०फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली असून या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव भगवंतराव पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि एन. सरोदे आणि जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांची उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांबाबत उच्च न्यायालयाची आता थेट केंद्र सरकारला विचारणा

News Desk

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी!

News Desk

‘एनआयए’ला आत्मसमर्पणापूर्वी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी भारतीय लोकांसाठी लिहिलेले खुले पत्र

News Desk