HW News Marathi
महाराष्ट्र

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

  • अर्जून खोतकरांना कॅबिनेटमंत्रीपदी बढतीची शक्यता
  • सुभाष देसाई, डॉ. दीपक सावंतांना डच्चू मिळण्याची शक्यता

मुंबई – शिवसेनेच्या आमदारांची स्वतःच्याच मंत्र्यांविरोधातील नाराजी विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना भोवण्याची शक्यता बळावली आहे. पक्षाच्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या ताब्यातील मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगानं 7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

शिवसनेची गुरुवारी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक असून त्यात आमदारांच्या तक्रारींचे निराकरण होणार असल्याची माहिती आहे. सत्तेत सहभागी असून कामे होत नसल्याची शिवसेनेच्या आमदारांची बऱ्याच दिवसांपासूनची तक्रार आहे. लोकांमधून निवडून गेलेल्या आमदारांऐवजी वरिष्ठ सभागृहातील नेत्यांना मंत्री केल्याचीही शिवसेनेत खदखद असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत शिवसेना मंत्र्यांचे खांदेपालट करण्याची शक्यता आहे. शिवसेना विधानपरिषदेच्या दोन मंत्र्यांसह दोन राज्यमंत्र्यांना नारळ देण्याची शक्यता आहे.

सुभाष देसाई, डॉ. दीपक सावंतांना डच्चू ?

शिवसेनेच्याच आमदारांची कामे होत नसल्याच्या तक्रारी शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना व्यवस्थित ‘मदत’ केली. भाजप आमदारांच्या मतदारसंघातील कामांना त्यांचे मंत्री प्राधान्य देतात, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आमदारांना असे ‘बळ’ दिले जात नाही असाही सेना आमदारांचा आरोप आहे. त्यात मागच्या दारातून (विधानपरिषद) आलेल्या नेत्यांना मंत्रीपद मिळाल्यानंही शिवसेनेत नाराजी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा आहे.

अर्जुन खोतकरांना कॅबिनेटमंत्रीपदी बढती तर अनिल परबांना मंत्रिमंडळात संधीची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे चाणक्य ठरलेले आमदार अनिल परब यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन त्यांना बक्षिसी दिली जाऊ शकते. भाजपच्या रेट्यातही मराठवाड्यात शिवसेना मोठी करण्यात अर्जुन खोतकर करत असलेल्या कामाची त्यांना पावती मिळण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री असलेल्या खोतकरांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई व डॉ. दीपक सावंत यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर एकनाथ शिंदे यांना चांगले खाते मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी ठाण्यात शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळवून दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 एप्रिल रोजी संपेल त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या एक दिग्गज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना सत्य मांडण्याचे बळ – .खोतकर

News Desk

काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार

News Desk