HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus :आठवडाभरात १५०० बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष’ कार्यान्वित होणार !

मुंबई | गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात ७०० मुंबईत २०० आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून ५०० असे राज्यभरात एकूण १ हजार ४०० बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष’ (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मंत्रालयात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते. येत्या आठवड्याभरात कार्यान्वित होणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. या रुग्णांचा इतर रुग्णांशी संबंध येऊ नये यासाठी हा स्वतंत्र कक्ष असणार आहे.

कोरोना तपासणीसाठीची लॅब होणार कार्यान्वित

पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे, जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या 3 दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार आहे. तर औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या ६ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या १५ दिवसात लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

केंद्र शासनाने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून या सूचनांनुसार सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. व्हेंटिलेटर, वैयक्तिक सुरक्षा करणारे किट, एन-९५ मास्क याबाबत आवश्यक त्या सूचना वैद्यकीय अधिष्ठाता यांना देण्यात आल्या असून याबाबत काहीही अडचण असल्यास त्यांनी वैद्यकीय सचिव/संचालक यांच्याशी संपर्क करावा असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दररोज ४ वाजता मेडिकल बुलेटिन

देशमुख म्हणाले की, “वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दररोज दुपारी 3 वाजेपर्यंत दिवसभरातील कोरोना रुग्णासंबंधातील माहिती वैद्यकीय मंत्री यांचे कार्यालय, वैद्यकीय सचिव आणि वैद्यकीय संचालक यांना सादर करावे. यानंतर दुपारी ४ वाजता माध्यमांना मेडिकल बुलेटिन (वैद्यकीय निवेदन) द्यावे जेणेकरुन माध्यमांना वेळेत माहिती मिळेल शिवाय सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.

स्वच्छतेला प्राधान्य द्या

वैद्यकीय रुग्णालय/ महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालय, महाविद्यालय यांची स्वच्छता याला प्राधान्य द्या. तसेच रुग्णालय, महाविद्यालयाची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत अवगत करावे. येणाऱ्या काळात स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात यामध्ये नियमित हात धुणे, स्वच्छतेची काळजी याला प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयात आणि महाविद्यालयात स्वच्छतेबाबतची संस्कृती रुजविण्यासाठी अधिष्ठाता यांनी विशेष प्रयत्न करावेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाबत जनजागृती करा

कोरोना व्हायरस कशामुळे होतो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कोरोनाची नेमकी लक्षणे कोणती आहेत याबाबत महानगरपालिका/नगरपालिका यांच्या मदतीने जनजागृती मोहिम हाती घ्यावी. महाविद्यालयाच्या आवारात, वर्तमानपत्रात, आर्टवर्कच्या मदतीने, समाजमाध्यमांवरुन याबाबत जनजागृती करण्यासाठी अधिष्ठातांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले.

अधिष्ठाता, डॉक्टर, नर्सेस हे संकटमोचक

आताचा काळ हा आपत्तीचा काळ आहे. आताच्या परिस्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करीत असलेले डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी जबाबदारीने काम करीत असून त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना सुट्टी देण्यात आलेली नाही कारण या विद्यार्थ्यांनी आता या परिस्थितीत काम करुन डॉक्टर, नर्सेस यांना सहकार्य करावे. आताच्या परिस्थितीत आपण सर्वजण आपापल्या जबाबदारीचे भान राखून काम करीत असून महत्वाची भूमिका बजावत असल्याने आपण सर्व जण खऱ्या अर्थाने संकटमोचक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी सर्व अधिष्ठांताशी संवाद साधताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”, निलेश राणेंचा टोला

News Desk

“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

News Desk