नवी दिल्ली | “माझ्या हृदयाच्या जवळचे एक स्वप्न पूर्ण होत आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया देशातील राममंदिर आंदोलनाचा प्रमुख प्रमुख चेहरा असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिली आहे. बहुप्रतीक्षित अशा अयोध्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर, लालकृष्ण अडवाणी बोलत होते. दरम्यान, आज (५ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडेल. या सोहळ्यासाठी निमंत्रित पाहुणे कालच(४ ऑगस्ट) अयोध्येत दाखल झाले आहेत
लालकृष्ण अडवाणी अयोध्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्याबद्दल बोलताना म्हणतात कि, “अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणे हे भाजपचे स्वप्न आणि ध्येय आहे. आपल्या जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होते, ते आता पूर्ण होत आहे. अयोध्या येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. हा सोहळा निश्चितच केवळ माझ्यासाठी नव्हे तर देशातील करोडो लोकांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे.”
“भाजपने मला १९९० साली रामजन्मभूमी चळवळीदरम्यान सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेची जबाबदारी दिली होती. या संपूर्ण प्रवासाने असंख्य लोकांच्या आकांक्षा प्रेरित केल्या”, असे म्हणत लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर चळवळीत योगदान आणि बलिदान देणाऱ्या सर्व संत, नेतेमंडळी आणि लोकांप्रति आपली कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. दरम्यान, श्रीराम मंदिर ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यात आले असून या भव्य सोहळा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.