मुंबई | राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय काल (२० जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय ३ सप्टेंबर २०१९ व २१ मे २०१५ अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात आले आहे.
जनतेस माफक दरात वाळू मिळावी म्हणून हातची किंमत स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दराने करण्यास, वाळू उत्खननाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढविण्यास आणि यशस्वी लिलावधारकास हेतूपत्र मिळाल्यानंतर पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यास त्याचप्रमाणे खाडीपात्रात हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायाकरिता स्वामित्वधनाच्या दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविले
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलाची मर्यादा पाचशे कोटी रुपयांवरुन सातशे कोटी रुपये वाढविण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल दोनशे कोटी रुपयांनी वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. हे अतिरिक्त दोनशे कोटी रुपये भागभांडवल टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येईल.
मंगरुळपीर येथील जिल्हा न्यायालयासाठी नवीन पदे निर्माण
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या तालुक्यांसाठी मंगरुळपीर येथे नियमित स्वरुपात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय ही जोड न्यायालये २०१३ पासून कार्यरत आहेत.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, मंगरुळपीर यांचेसाठी २२ नियमित पदे व २ बाह्ययंत्रणेद्वारे काल्पनिक पदे निर्माण करण्यास आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, मंगरुळपीर यांचेसाठी २२ नियमित पदे व २ बाह्ययंत्रणेद्वारे काल्पनिक पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत झाल्याने मंगरुळपीर, मानोरा व कारंजा या तालुक्यातील नागरिकांच्या व पक्षकारांच्या दृष्टीने सोयीचे होईल. तसेच, या तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने न्यायदान प्रक्रिया जास्त लोकाभिमुख होईल.
सावनेर येथील न्यायालयात पदनिर्मिती
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन करण्यास व पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या न्यायालयासाठी ४ नियमित पदे व ३ बाह्ययंत्रणेद्वारे काल्पनिक पदे निर्माण करण्यास आणि दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, सावनेर या न्यायालयातून दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, सावनेर या न्यायालयासाठी १५ पदे हस्तांतरीत करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
सावनेर, जिल्हा नागपूर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन झाल्याने सावनेर व कळमेश्वर तालुक्यांतील नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होईल. तसेच या तालुक्यांतील जनतेच्या दृष्टीने न्यायदान प्रक्रिया जास्त लोकाभिमुख होईल.
विभागीय, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी अनुदानाची मर्यादा वाढविली
राज्यातील क्रीडा सुविधा वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल तसेच तालुका क्रीडा संकुलांसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आला. सध्या विभागीय क्रीडा संकुलांसाठी आर्थिक मर्यादा २४ कोटी असून ती वाढवून ५० कोटी, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी ८ कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून २५ कोटी रुपये आणि तालुका क्रीडा संकुलांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून ५ कोटी रुपये या प्रमाणे वाढविण्यास मान्यता दिली. ही सुधारित अनुदान मर्यादा, यापूढे प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या व बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांसाठी लागू राहील.
ज्या क्रीडा संकुलांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून बांधकाम पूर्ण झाले आहे अथवा बांधकाम सुरू आहे अशा संकुलांबाबत तालुका क्रीडा संकुल ३ कोटी, जिल्हा क्रीडा संकुल १५ कोटी व विभागीय क्रीडा संकुल ३० कोटी रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. हे सुधारित अनुदान अशा क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडा / मुलभुत सुविधा याचे बांधकाम, नवीन क्रीडा उपकरणे व साहित्य तसेच उपलब्ध क्रीडा सुविधांचे अद्ययावतीकरण, बळकटीकरण याकरिता वापरता येईल.
क्रीडा संकुलांचा वापर खेळाडू, सर्वसामान्य नागरिक इत्यादींना जास्तीत जास्त करता यावा व क्रीडासंस्कृती वाढीस लागावी यासाठी पुढील निर्देशही लागू राहतील ते असे- क्रीडा संकुले, खेळाडू, सर्व संबंधित व सामान्य जनतेसाठी उपलब्ध/खूली राहतील. क्रीडा संकुलांचा वापर क्लबहाऊस सारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर क्रीडा संकुलांचे व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे सोपवू नये. क्रीडा संकुलाचा वापर करताना अधिकृत राज्य/राष्ट्रीय क्रीडा संघटना यांना प्राधान्य देण्यात यावे. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे/व्यक्तींकडे सोपविण्याचा निर्णय घ्यावयाचा असल्यास अशा प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता घेणे आवश्यक राहील.
हे अनुदान मंजूरीसाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात येणार असून क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरूस्ती धोरण, क्रीडा संकुल पालकत्व धोरण याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.