HW News Marathi
महाराष्ट्र

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

गडचिरोली । गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडिकल कॉलेज सुरू करणार असे जाहीर केले. ते काल (११ जुलै) पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीला आले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीचा गडचिरोली दौरा केला. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने येणे व पाहणी करणे शक्य झाले नाही, मात्र रस्ते मार्गाने येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरितांबाबत माहिती सादर केली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. तसेच तालुकास्तरावरून ऑनलाईन स्वरूपात उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवादात थेट तालुकास्तरावरील तहसीलदारांशी संवाद साधला तर प्रलंबित वन विभागाच्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

तत्पूर्वी गडचिरोलीकडे येताना आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीमधे  नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. तसेच पूर बाधितांचा सर्वे करून तातडीने मदत करावी, पंचनामे सुरू करावे,  जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरील पडलेले खड्डे कायमस्वरूपी भरून काढावे. वन विभागामुळे अडलेल्या रस्त्यांचा प्रश्न निकाली काढावा. संजय सरोवर, गोसी खुर्द व मेडीगट्टा बॅरेजचा पाणीसाठा व विसर्गासंदर्भात उत्तम समन्वय साधावा. पूरग्रस्तांना निवारा केंद्रात जिल्हा प्रशासनाने स्वत: सेवा पुरवाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी सूचना केली तसेच अधिकारी कर्मचारी यांनी अशा गंभीर परिस्थितीत मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय कामांची सुरूवात गडचिरोली जिल्ह्यापासून करायची असे आमचे ठरले होते, मात्र राज्यातील पूर परिस्थितीमुळे तातडीने गडचिरोलीमधे यावे लागले व कामाची योगायोगाने सुरूवात झाली असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीचा समारोप करताना मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी पालकमंत्री म्हणून काम केल्यामुळे येथील समस्यांची जाण आहे. नक्षग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला दर पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या असणे योग्य नाही. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या गावांचा कधीच संपर्क तुटणार नाही अशा शाश्वत उपाययोजना केल्या जातील. तसेच नक्षल चकमकीत जखमी जवानांसह सामान्य नागरिकांना उत्त्म आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी मेडिकल कॉलेज लवकरच सुरू करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू – उदय सामंत

News Desk

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

Aprna

शेतीच्या पाण्याचे दर वाढवल्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न –अजित पवार

swarit