HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयातील ‘त्या’ बैठकीला अजित पवारांनी पुण्याच्या महापौरांना का डावललं?

पुणे | देशासह महाराष्ट्रातही कोरोनाची परिस्थिती चिंतेचा विषय ठरली आहे. अशात पुण्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतात. इतकंच नाही तर पुण्याच्या इतर अडचणींचा आढावा घेण्यासाठीही अजित पवार बैठक घेत पुण्याच्या महापौरांशीू चर्चा करतात. दरम्यान, आज (२९ जून) पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावली आहे या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना बोलावलं नाही आहे. यामुळे नाराजीचं एक ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

काय लिहिलं आहे ट्विटमध्ये?

‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील’.

‘कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत.गेल्या चार वर्षांत पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच !, असं सूचक ट्विट मोहोळ यांनी केलं आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

“सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!”

‘पुणे महापालिकेला कचरा प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, त्यातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काल (२८ जून) पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सुप्रिया सुळे यांनी सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आम्ही चौकशीसाठी तयार असल्याचं प्रत्युत्तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे. “पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रिया सुळे यांना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून, त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रिया सुळे यांनी हाच विश्वास कायम ठेवावा. त्यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?,” असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे बोर्डाने सांगितले सध्या महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

News Desk

बीएमसीच्या पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेचा विजय

News Desk