मुंबई | औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या मुद्यावरुन कॉंग्रेस आणि शिवसेनेत मतांतर असल्याचे समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. या मुद्द्यावर मी गेल्या आठवड्यातच बोललं होतो. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने या विषयावर एकत्र बसून चर्चा करूनच मार्ग काढू असं सांगतानाच मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्याची आम्ही शहानिशा करून त्यामागचे कारण शोधू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. नेमकं हे का झालं? जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. नक्की काय झालं याची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं ते म्हणाले.