HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील मोफत लसीकरणाबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…

मुंबई | राज्यात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हे लसीकरण महाराष्ट्रात मोफत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यावर आज (२७ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. विधानभवनात आज ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

“उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. लसीची कमतरता संपूर्ण देशाला जणवते आहे. केंद्र सरकारचं लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिविर इंजेक्शन कंपन्यांवर नियंत्रण आलं आहे. देशातल्या सर्व जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारने करायला हवं. पण भारत सरकारची भूमिका आहे ४५ पासून पुढे सगळ्यांना मोफत लसीकरण. पण ४४ वयोगटापर्यंतच्या लोकांचं काय? असं देखील आम्ही विचार करत आहोत. उद्या तशीच वेळ पडली, तर राज्य सरकार कुठेही मागे पडणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांना देखील खोचक शब्दांत सुनावलं. “सध्या महाराष्ट्रात रुग्णांचं प्रमाण जास्त दिसत आहे. त्यामुळे आम्हाला जास्त ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसीचा कोटा द्यायला हवा. आम्ही उद्या ग्लोबल टेंडरवर देखील चर्चा करणार आहोत. मध्ये काहींनी माझं (ग्लोबल टेंडरबाबत) वक्तव्य आल्यानंतर केंद्र सरकारची परवानगी नसताना यांनी परस्पर कसा निर्णय घेतला? अशी शंका उपस्थित केली. उद्या बाहेरून जर लस आणायचं म्हटलं आणि आपल्या देशातील सिरम आणि भारत बायोटेक तेवढं उत्पादन करण्यात असमर्थ असतील, तर देशाचे प्रमुख यासाठी परवानगी नाकारतील असं वाटत नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा लसीकरणाचा तिसरा टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लसीचा पुरेसा साठा आणि लसीची किंमत या दोन मुद्द्यांवर चर्चा सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा कसा उपलब्ध होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच, लसींची किंमत देखील अदर पूनावाला आणि भारत बायोटेकने वाढवली असल्यामुळे राज्यात मोफत लसीकरण करता येईल का? यावर चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना जयंत पाटलांनी दिले आश्वासन 

News Desk

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

News Desk

“मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय” – रामदास आठवले

News Desk