HW News Marathi
देश / विदेश

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची खिल्ली उडवली आहे. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काल (२३ मार्च) जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आज (२४ मार्च) भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर विविध आरोप केले.

लवंगी फटका होता तर इतके दिवस दाबून का ठेवला? – देवेंद्र फडणवीस

“काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच २५ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी बोललं पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे.

पण त्यांना माहिती आहे की यावर बोललं तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकार व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत,” असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

विरोधी पक्षनेते काल बॉम्ब घेऊन आले होते, पण तो भिजलेला लवंगी फटाका होता – संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणाची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचं कळलं. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रं काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. तो नीट वाचा. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काहीच नाही.

सरकारने काही चुकीचं केलं अशी एकही ओळ नाही, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे काही अधिकारी असू शकतात. त्यांनी काही सहेतूने ती कागदपत्रं बनवली असतील, असा चिमटा काढतानाच विरोधी पक्षनेते काल बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटाका होता. त्या फटाक्याला वातही नव्हती. आम्ही शोधत होतो हा बॉम्ब कुठे तरी फुटेल. पण त्यात दमच नव्हता. त्यामुळे तो फुटलाच नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला होता.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली गृह सचिवांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आपण केंद्रीय गृह सचिवांकडे एका बंद पाकीटात सर्व पुरावे दिले आहेत. तसंच त्यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची नक्कीच दखल घेऊ आणि सरकार या प्रकरणी योग्य ती करावाई करेल, असं आश्वासन त्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी गृह सचिवांच्या भेटीनंतर सांगितलं.तसेच, गरच पडल्यास या प्रकरणी कोर्टात देखील जाऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, “डीजीपींनी सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणातील पुरावे आपण गृह सचिवांना दिले आहेत. २५ ऑगस्टपासून अहवाल का लपवण्यात आला? सीआयडी चौकशी का थांबवली गेली? राज्यातील ठाकरे सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? या प्रकरणी कोर्टात जाण्याची आपली तयारी आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो – पंतप्रधान

News Desk

बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ

News Desk

Section 377 | आज सर्वोच्च न्यायालय समलैंगिकतेच्या वैधतेबद्दल निकाल देणार

News Desk