HW News Marathi
महाराष्ट्र

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’

अमरावती । मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व व नंतर असे एकूण 28 दिवस मार्गदर्शन व आवश्यक उपचार मिळवून देणारी मोहीम जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आशासेविका व अंगणवाडीसेविकांच्या संयुक्त पथकाकडून गरोदर मातांशी संपर्क साधून प्रकृतीची माहिती मिळवून उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. ‘मेळघाट मिशन 28’ अंतर्गत आशासेविका व अंगणवाडी सेविका माता व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रसूती सुरक्षित व्हावी आदींसाठी आवश्यक माहिती संकलन, उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य सेविका,आशा सेविका व अंगणवाडी सेविका असे ‘ट्रिपल ए’ मनुष्यबळ आरोग्य सेवेचा पाया मानला जातो. ‍या महिला कर्मचारी मेळघाटात घरोघर जाऊन मातेस प्रसुतीअगोदर व नंतर एकूण 28 दिवस आधी ट्रॅकिंग करणार आहेत. त्यात आरोग्याबाबत विविध प्रपत्रे भरून घेण्यात येणार आहेत.

धारणी व चिखलदरा तालुका मिळून सुमारे सव्वातीन लाख लोकसंख्या असलेल्या मेळघाटात माता नोंदणीची आकडेवारी साधारणत: साडेसहा हजार आहे. गरोदर माता, स्तनदा माता व नवजात बालकांना भेटून आवश्यक माहिती संकलन आशा व अंगणवाडी सेविका करणार आहेत.

आरोग्य उपचाराच्या दृष्टीने प्रसुतीची अपेक्षित तारीख, खेप, हिमोग्लोबिनची मात्रा, इतर लक्षणे, आजार, काही धोक्याची लक्षणे आहेत किंवा कसे, आदी बाबींची तपासणी व विचारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, बालकाची तपासणीही करून माहिती संकलन करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे माता व बालकांतील धोका व जोखीम ओळखण्यास मदत होऊन गतीने उपचार मिळवून देणे शक्य होईल. मेळघाटात दोन्ही तालुक्यांत ४७८ अंगणवाडी सेविका व ३९७ आशासेविका कार्यरत आहेत, असे श्री. डॉ. रणमले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

News Desk

शाहीनबागला मुस्लिम संघटनेकडून फडिंग केल्याचा प्रविण दरेकरांनी केला आरोप

swarit

Hw Exclusive | अमोल कोल्हेंच्या डाॅ. पत्नी केईएममध्ये निभावतायतं कर्तव्य !

Arati More