मुंबई | कोविड-१९ महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासून युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मुंबईला कोविड महामारीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असतानाही त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना काहीप्रमाणात यश येत असून सुरुवातीला कोविड-१९ चा मृत्यूदर ९ होता तो आता ३.५ % पर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. यापुढेही युद्धपातळीवर काम करुन कोविड-१९ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेख पुढे म्हणाले की, मुंबईतील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आला. आजपर्यंत ७६६२८ चाचण्या मुंबईत करण्यात आल्या असून ६८७९ लोकांना लागण झाली आहे तर १३६४ लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत २९० मृत्यू झाले आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात क्वारंटाईनची सोयही करण्यात आलेली आहे.
धारावी, मालवणी, गणपत पाटील नगर सारख्या भागावर लक्ष देऊन त्यातून ६५०० लोकांच्या चाचण्या केल्या, त्यात २४० रुग्ण सापडले. कोरोनाचा मुकाबला करताना ज्येष्ठ नागरिक व ज्यांना आधीपासून मधूमेह, रक्तदाबासारखे इतर आजार आहेत त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. मुंबईतील कटेंननेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कटेंनमेंट भागात आणखी चाचण्या वाढवण्याची गरज आहे त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. मुंबईतील हॉटस्पॉट भागात रॅपिड ऍक्शन टीम स्थापन करुन वार्डनिहाय तपासणी केली जात आहे.
झोपडपट्टीतल्या लोकांच्या विलगीकरणासाठी शाळा, इतर इमारती ताब्यात घेऊन तेथे क्वारंटाईनची व्यवस्था केलेली आहे.
धारावीमध्ये सव्वा लाख लोकांची घरोघऱी जाऊन तपासणी करण्याचे काम केले त्यात १३०० पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. परदेशातून विमान प्रवास करून मुंबईत आलेल्या ३ लाख लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच डायलीसीसच्या रुग्णांसंदर्भात तक्रारी येत होत्या परंतु आता अशा पेशंटसाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. असेही शेख म्हणाले.
मुंबईत स्थलांतरीत मजुरांची संख्या जवळपास ६.५ लाख आहेत, त्यांना दररोज दोन वेळचे जेवण पुरवण्याचे काम मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे परंतु छोट्या खोल्यांमधून दाटीवाटीने राहत असलेल्या या मजुरांना आता त्यांच्या गावी जायचे आहे. अशा मजुरांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असून मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन्स, महसूल विभागाची यंत्रणा त्यासाठी कामाला लागलेली आहे.
कोणत्या राज्यातील, शहरातील मजूर आहेत त्यांची माहिती एकत्र करून त्यांना टप्प्याटप्प्याने रेल्वे किंवा बसने त्यांच्या गावी पाठवण्याची सोय केली जाईल. सर्व व्यवस्था झाल्यानंतर अशा मजुरांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांना पाठवायची काय व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती दिली जाईल, असेही शेख म्हणाले.
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका मत्सव्यवसायाला बसलेला आहे. सरकारने राज्यात मासेमारी करण्यास परवानगी दिलेली होती परंतु वाहतूक व्यवस्था नसणे व बाजार बंद असल्याने शेकडो टन माशांचे नुकसान झाल्याची माहितीही मत्सव्यवसाय मंत्री असलम शेख यांनी दिली.
LIVE: Press Conference by Shri. Aslam Shaikh, Minister for Textile, Port and Fisheries https://t.co/vF9u6ox2Fl
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.