मुंबई | भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे नेहमीच सरकारवर टीका करत असतात. उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. याचाच परिणाम राज्याच्या जीएसटी उत्पन्नात मोठी घट होण्यात झाला आहे. आघाडी सरकारचा विनाशी कारभार असाच चालू राहिला तर राज्य आर्थिक अधोगतीकडे जाईल, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज(३ स्पेटम्बर) केली आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात मोठी आहे
ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राच्या उत्पन्नात जुलैच्या तुलनेत 3 हजार 728 कोटींची घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांच्या जीएसटी उत्पन्नात ऑगस्टमध्ये वाढ झाली असताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या उत्पन्नात एवढी मोठी घट होणे चिंताजनक आहे. ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात मोठी आहे, अशा राज्याच्या उत्पन्नात घट होण्यास आघाडी सरकारचा कारभार जबाबदार आहे, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
ठाकरे सरकारच्या ‘वसुलीखोर‘ धोरणामुळे राज्य उद्योगातही अधोगतीकडे. राज्याच्या जीएसटी संकलनामध्ये जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात तब्बल ३७२८ कोटी रुपयांची घट झाली आहे. जीएसटी संकलन कमी का झाले याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. pic.twitter.com/zezqa6PfVN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2021
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने उद्योजकांना खंडणीसाठी धमकावले जात असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळविले होते. राष्ट्रीय महामार्गाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना शिवसेना आमदारांकडून धमकावले जात असल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी याची दाखल न घेतल्याने खंडणीखोर मोकाट सुटले आहेत, असा आरोपही भातखळकर यांनी यावेळी केला आहे.
भातखळकरांना अटक
महाविकास आघाडी सरकारविरोधात 30 ऑगस्ट रोजी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिम येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच भातखळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राज्यातील बार, दारूची दुकाने, मॉल सुरू करणाऱ्या मात्र कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं होतं.
कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व निर्बंध शिथिल केले, मात्र, मंदिरं बंदच ठेवली. करोडो हिंदू भाविकांच्या श्रद्धेसोबतच मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. बार चालकांना करात सवलत देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या सर्वसामान्यांना कोणतीही मदत दिली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.