गुजरात | बनजरंग डाळ हा संघ कायमच आक्रमक भूमिकेत दिसत असतो. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात बजरंग दलाने भारताचं प्राचीन पुस्तक ‘कामसूत्र’ जाळलं आहे. हे पुस्तक हिंदू देवी-देवतांना अश्लील रुपात दाखवत त्यांचा अपमान करत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने हे पुस्तक पेटवलं. इतकं करुनही बजरंग दलाचे कार्यकर्ते थांबले नाही, तर त्यांनी पुस्तक दुकानदाराला पुन्हा या पुस्तकाची विक्री केल्यास दुकानालाच आग लावण्याची धमकी दिली. या घटनेनंतर देशभरात धार्मिक कट्टरतावादी संघटनांच्या या आक्रस्ताळेपणाची जोरदार चर्चा होतेय. लेखक, साहित्यिक, इतिहासकारांकडून या संघटनांच्या सामान्य ज्ञानावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
अहमदाबाद जिल्ह्यातील एसजी महामार्गावर लॅटीट्युट नावाचं पुस्तक दुकान आहे. बजरंग दलाचा स्थानिक संयोजक जवलित मेहता याने या दुकानाच्या बाहेर कामसूत्र पुस्तकाची एक प्रत जाळली. तो म्हणाला, “या पुस्तकात कामसूत्राच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांच्या फोटोंचा चुकीचा वापर केलाय. यावेळी आम्ही हे पुस्तक दुकानाच्या बाहेर जाळलं आहे. मात्र, या पुस्तकाची विक्री सुरूच राहिली, तर पुढच्यावेळी दुकानासोबत सर्व पुस्तकं जाळून टाकू.” जवलित मेहताने हा इशारा देणारा एक व्हिडीओ जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय आहे कामसूत्र?
कामसूत्र हे भारताचं प्राचीन पुस्तक आहे. आचार्य वात्सायन यांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात वात्सायन यांनी भारतातील स्त्री-पुरुषांचे लैंगिक आणि इतर संबंध यावर प्रकाश टाकलाय. माणसाच्या लैंगिक गरजा आणि त्याचं स्वरुप यावर या पुस्तकात विस्तृतपणे माहिती देण्यात आलीय. हा ग्रंथ लैंगिक इतिहासाची माहिती देणाऱ्या मोजक्या प्राचीन ग्रंथांपैकी एक आहे. त्यासाठीच हे पुस्तक जगभर प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिशांनी या पुस्तकांचं इंग्रजीतही भाषांतर केलं. ब्रिटिश संशोधक आणि भाषांतरकार सर रिचर्ड बर्टन यांनी 1855-1860 या काळात भारतात असताना या ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी 1870 च्या दशकात या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित केलं. त्यानंतर हा ग्रंथ संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. कामसूत्र ग्रंथामुळेच प्रेरित होऊन राजस्थानची भित्तीचित्रे, खजुराहो, कोणार्कसारखी शिल्पं तयार झाली, असंही सांगितलं जातं.
बजरंग दलाने याआधी अनेक घटनांमध्ये हिंसा केली
हिंदू कट्टरतावादी संघटना बजरंग दलाने याआधी अनेक घटनांमध्ये हिंसा केलीय. काही काळापूर्वी कर्नाटकाच्या मंगळुरु येथे विचित्र प्रकार समोर आला होता. दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत फिरायला गेला म्हणून एका तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे.
मारहाण करणाऱ्या आरोपींनी 1 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता बस रोखली. बसमध्ये प्रवास करणारा संबंधित मुलगा आणि मुलीला बसखाली उतरवलं. त्यानंतर तरुणाला प्रचंड मारहाण केली. मुलगा-मुलगी हे दोघं एकाच वर्गात शिकले. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण त्यांचा धर्म वेगळा आहे. त्यावरुन आरोपी नराधमांनी तरुणाला प्रचंड मारहाण केली. यावेळी तरुणीने तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही दुखापत झाल्याचं समोर आलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.