बेळगाव | आज (१७ एप्रिल) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. तसेच, बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठीही आज मतदान होत आहे. जवळपास १८ लाख मतदार बेळगावचा १८वा खासदार कोण, हे ठरवणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे एकूण १२ तास हे मतदान चालणार आहे. निवडणूक कर्मचार्यांनी काल सकाळी निवडणूक साहित्य घेऊन दुपारीच मतदान केंद्रांचा ताबा घेतला. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
प्रत्येक मतदाराची थर्मल चाचणी करूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे थर्मल चाचणीत ताप जास्त आढळल्यास रॅपिड चाचणी केली जाणार असून, ती पॉझिटिव्ह आल्यास अशा मतदाराला सायंकाळी ६ ते ७ यावेळेत पीपीई किट परिधान करण्यास लावून मतदान करवून घेतले जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळीके यांच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊतही बेळगावात आले होते.
बेळगाव लोकसभेसाठी ही १८वी निवडणूक पार पडत आहे. यासाठी आज १८लाख १३ हजार ५६७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचार्यांना येथील बी. के. मॉडेल हायस्कूल आणि क्लब रोडवरील वनिता विद्यालय हायस्कूलच्या मैदानावर उभारलेल्या शामियान्यात निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके, भाजपकडून मंगला अंगडी आणि काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. याशिवाय आणखी सात उमेदवार आहेत. मात्र लढत काँग्र्रेस आणि भाजपमध्येच होईल. मतमोजणी २ मेला होणार आहे. आज बसव कल्याण आणि मस्की या दोन विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे. मतदानासाठी सरकारी आणि खासगी कर्मचार्यांना पगारी सुटी असेल. तसा आदेश कंपन्यांना देण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.