अहमदाबाद। गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला काही दिवसांनी शपथ दिली जाईल असं सांगितलं जात आहे.
नरेंद्र मोदींच्या पटेल यांना शुभेच्छा
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील’, असं म्हटलंय.
Congratulations to Bhupendra Bhai on taking oath as CM of Gujarat. I have known him for years and have seen his exemplary work, be it in the BJP Organisation or in civic administration and community service. He will certainly enrich Gujarat’s growth trajectory. @Bhupendrapbjp
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2021
मतदारसंघातील ‘दादा’
ते घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 17 हजार मताने विजयी झाले आहेत. त्यांची संघटनेवर आणि मतदारसंघावर चांगली पकड आहे. मतदारसंघातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मतदारसंघात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते.
पटेल ते पटेल
भूपेंद्र पटेल ज्या घटलोडिया मतदारसंघातील आमदार आहेत, त्या मतदारसंघातून या पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल निवडणूक लढवायच्या. आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत खास म्हणूनही ते ओळखले जातात.
या नेत्यांना पछाडलं
रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली होती. नितीन पटेल, मनसुख मांडविया, आर. सी. पाटील आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. या दिग्गज नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली जातील अशी चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा नवा चेहरा देऊन सर्वांना धक्का दिला आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने असंच धक्कातंत्र वापरलं होतं. तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने पुष्करसिंह धामी या नव्या चेहऱ्याला संधी देऊन सर्वांना कोड्यात टाकलं होतं. तेच गुजरातमध्ये घडलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.