मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल (१ मार्च) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीवर देखील काल त्या बोलत होत्या. “मराठवाड्याच्या विकासाचा आणि त्या १२ आमदारांचा संबंध काय? उपमुख्यमंत्री अजित पवार (यांचं हे विधान दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. त्या मुंबईत बोलत होत्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.
आता यावरून पंकजा मुंडे यांनीही अजित पवारांवर हल्लाबोल केला. “वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि १२ आमदारांच्या निवडीचा संबंध काय? अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असं अजित पवार म्हणाले होते.