HW News Marathi
महाराष्ट्र

‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार!’

मुंबई | भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ठाकरे सरकारवर भयंकर आरोप केला आहे. “संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरु आहेत. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार आहे.

घर कोंबडया सरकारमुळेच महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत.” अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. तसेच, अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरासमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार असल्याची माहिती खापरे यांनी दिली आहे.

ठाकरे सरकार कुचकामी ठरले

“महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना, अनेक कुटुंबं अत्याचारांच्या भयाने धास्तावली आहेत. त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे”, अशी टीका खापरे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

ठाकरे सरकार मात्र निष्क्रीयपणे घरात बसून

“पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र करोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही. उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जीवाशी खेळ केला जातो. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणाऱ्यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी अशी प्रार्थना बंद मंदिरासमोर करण्यात येईल.” असे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का?

“करोना काळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली, तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सरकार पाहात आहे. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले आहे. घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का?” असा सवालही उमा खापरे केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका!’

News Desk

“राज्यपालांच्या दौऱ्यामुळं पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही”- प्रविण दरेकर

News Desk

2022 पर्यंत भारताच्या सीमेवरील कुंपणाचे काम पूर्ण होणार; अमित शहांनी दिली माहिती

News Desk