HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पवारांना संकटकाळी जाग असतेच, चंद्रकांत पाटील दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा | सामना

मुंबई | शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा, अशी टीक सामनाच्या अग्रलेखातून आज (११ जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

निसर्ग वादळाचा सर्वात जास्त तडाखा अलिबाग, रेवदंडा, चौल, नागाव, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, दिवेआगर अशा भागांना बसला. नुकसानीचे पंचनामे सुरू होण्याआधीच सरकारने तातडीची मदत जाहीर केली, असेही सामनात सांगितले. तर  शरद पवार हे त्यांच्या पद्धतीने लोकांना भेटून नुकसानीची, मदत कार्याची माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दुखणाऱ्या पोटावर डावा हात दाबत उजवी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारली आहे. ”शरद पवारांना आता जाग आली का?” असा उटपटांग सवाल पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांचा खरपूरस समाचार घेतला.

दरम्यान, सामनात म्हणाले, पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले, असे त्यांनी सांगितले.

सामनाचा आजचा अग्रलेख

प. बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा!!

संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी श्री. शरद पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा छोटेखानी दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते. निसर्ग वादळाचा सर्वात जास्त तडाखा अलिबाग, रेवदंडा, चौल, नागाव, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, दिवेआगर अशा भागांना बसला. नुकसानीचे पंचनामे सुरू होण्याआधीच सरकारने तातडीची मदत जाहीर केली. आता श्री. शरद पवार हे त्यांच्या पद्धतीने लोकांना भेटून नुकसानीची, मदत कार्याची माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दुखणाऱ्या पोटावर डावा हात दाबत उजवी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारली आहे. ”शरद पवारांना आता जाग आली का?” असा उटपटांग सवाल पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात

पहाटे शपथ

सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही. विरोधी पक्ष तातडीने कोकणात नुकसानीची हालहवाल पाहण्यासाठी गेला, हे योग्यच झाले. भाजपने पत्रे, ताडपत्री, प्लॅस्टीक वगैरे माल कोकणात पोहोचवला. कोकणवासीयांना तात्काळ 15 हजार रुपये प्रत्येकी मदत करावी, अशी त्यांनी मागणी केली. चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे असे की, ‘या सरकारला वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाजच आलेला नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत फुटकळ आहे. येथे हेक्टरी अथवा एकरी यावर नुकसानभरपाई देणे चुकीचे आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू अशी उत्पन्न देणारी झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथे नवीन झाडे लावल्यानंतर पुढील दहा वर्षे उत्पन्न मिळणार नाही,’ अशी गुप्त माहिती पाटील यांनी दिली आहे. सरकारला काय हे माहीत नाही? कृषी क्षेत्र हाच ज्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे त्या शरद पवारांना तरी असे सल्ले कोणी देऊ नयेत. वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत, पण पाटील व त्यांचे लोक ”पवारांना आता जाग आली काय?” असे विचारून एकप्रकारे

वाजपेयी-मोदींचाच अपमान

करीत आहेत. सांगलीच्या महापुरात पाटलांचे सरकार किती व कसे जागे होते याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यावेळचे सरकार जागे राहून पुरात फक्त सेल्फी काढण्यात दंग होते. त्यामुळे पूरग्रस्त इतके खवळून उठले की, भाजपच्या मंत्र्यांना त्यांनी जागोजागी अडवून जाब विचारला होता. शेवटी या सगळ्यांना जनतेने घरी बसवले. पवारांना जाग आली की नाही याचा निकाल राज्याची जनता देईल, पण संकटकाळात महाराष्ट्राला भरघोस मदत करावी यासाठी केंद्राला जाग आली आहे काय? प. बंगालात ‘अम्फान’ वादळ आले. तेथे पंतप्रधान मोदी पोहोचले हे चांगलेच झाले, पण तसाच सर्वनाश महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरही झाला. प. बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा!!

Related posts

भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे

News Desk

बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? – उदयनराजे भोसले

News Desk

वरळी कोळीवाडा कंटेनमेंट झोनमुक्त होणार

News Desk