HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पालिकेनं ३९,०३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

मुंबई | मुंबई महानगरपालिकाचा सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प आज (३ फेब्रुवारी) पालिका सभागृहात सादर करण्यात आला आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुंबई पालिकेनं यंदा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीचा मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प ३३ हजार ४४१ कोटी इतकं होतं. यावेळी त्यात १६.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मालमत्ता करात सरसकट माफी मिळणार का? याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचं लक्ष लागून होतं. पण महापालिकेकडून त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मालमत्ता करातील सर्वसाधारण करच सध्या माफ आहे. इतर नऊ प्रकारचे कर लागू आहेत. त्यानुसारच तूर्तास २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

मालमत्ता करातून मुंबई पालिकेला ६७६८.५८ कोटी उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. परंतु सुधारित अर्थसंकल्पानुसार आता साडेचार हजार कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होतील, असं चहल यांनी यावेळी सांगितलं. सन २०२० – २०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात २२६८.५८ कोटींची घट झाली आहे. उत्पन्नाचे दुसरे प्रमुख स्त्रोत असलेल्या विकास नियोजन खात्यातून ३८७९.५१ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत केवळ ११९९.९९ कोटी उत्पन्न जमा झाले आहे. एस.आर.ए कडून महापालिकेला जमीन अधिमूल्य पोटी ६१८ कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारामुळे ९८२ कोटी येणे आहे. तसेच राज्य शासनाकडून विविध कार्यालयांकडून ५२७४ कोटी येणे बाकी असल्याचीही माहिती चहल यांनी दिली.

काही महत्त्वाचे मुद्दे-

नायर रुग्णालयात लवकरच १.५ टेस्ला एमआरआय सुविधा उपलब्ध करून देणार, १७ ते २० कोटींची तरतूद

लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्धतेसाठी कोविड फंडातून ४०.३० कोटींची तरतूद

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या घरातच करण्यासाठी विशेष धोरण – पाच कोटी रुपयांची तरतूद

नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी २० कोटींची तरतूद

संसर्गजन्य रोगांसाठी २०३० पर्यंत १०० टक्के बालकांचे लसीकरण करणार

कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार

नवीन इमारतींना अग्नी व जीव संरक्षण व्यवस्था या अनुषंगाने परवानगी देण्याकरिता महापालिकेतर्फे छाननी शुल्क आकारले जाते. या शुल्कात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन

देवनार पशुवध गृहाच्या आधुनिकीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा निधी

कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी १३०० कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करता एक हजार 119 कोटी

सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 1339. 94 कोटी, मोठ्या जलवाहिन्यांची कामे २२९.५० कोटी, मिठी नदी प्रकल्पची कामे ६७ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी महापालिकेने आगामी आर्थिक वर्षात ७५० कोटी तरतूद

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन आणि वेळेच्या बचतीसाठी ‘मेट्रो’ उत्तम पर्याय! – एकनाथ शिंदे

Aprna

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्था’वर दाखल; चर्चांना उधाण

Aprna

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk