मुंबई । बलात्काराचे आरोप झाल्याने त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातील खुलशामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात, “धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात की, “सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजपच्या महिला शाखेच्या वतीनं एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर असे आरोप होतात त्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो”, असे चंद्रकांत पाटील म्हणतात.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडीवर बोचरी टीका करत पुढे चंद्रकांत पाटील असेही म्हणतात की, “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.” दरम्यान, भाजपने धनंजय मुंडे यांच्याविरोधात अशी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने महाविकासआघाडी सरकार याला कसे सामोरे जाणार हे पाहावे लागेल.