मुंबई। मुंबईतील वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी होणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
बीडीडीची स्थापना?
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.
अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते
या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ , नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे
सर्व सोयी सुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण
शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौ. फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार असून येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयी सुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे ज्यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.
कशी असेल रचना
वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार असून रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसवण्यात येणार असून खिडक्यांकरिता पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे.
या मान्यवरांची असेल उपस्थिती
वरळी येथील जांबोरी मैदान भागात आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल डोंगरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत
जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झाली होती बैठक
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम होणार आहे. याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (1 ऑगस्ट) होईल. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.